माहुल वासियांच्या पुनर्वसनाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच; रहिवाशांमध्ये नाराजी

माहुलमधील आरोग्याला घातक असलेल्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत. संबंधित नागरिकांचे कुर्ला येथे 'एचडीआयएल' बिल्डरने बांधलेल्या इमारतींमध्ये स्थलांतर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याप्रकरणी पालिका, एमएमआरडीए, म्हाडा आणि एसआरए यांच्यामध्ये नियोजन करून कोणत्या प्रकारे घरे उपलब्ध करून देता येतील याबाबत दोन ते तीन दिवसांत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन २१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आले होते.

  मुंबई : माहुलमधील १६०० घरांचे कुर्ला येथील एचडीआयएल कॉलनीत स्थलांतर करण्याप्रकरणी तीन दिवसात निर्णय घेण्याचा शब्द राज्य सरकारने दिला होता. मात्र वीस दिवसानंतरही प्रशासनाने कोणतीही हालचाल सुरू केलेली नाही. तर दुसरीकडे माहुलमधील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित सरकारी अधिका-यांची बैठक घेतली. याबाबत रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण कमी कराच मात्र आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.

  माहुलमधील आरोग्याला घातक असलेल्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत. संबंधित नागरिकांचे कुर्ला येथे ‘एचडीआयएल’ बिल्डरने बांधलेल्या इमारतींमध्ये स्थलांतर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याप्रकरणी पालिका, एमएमआरडीए, म्हाडा आणि एसआरए यांच्यामध्ये नियोजन करून कोणत्या प्रकारे घरे उपलब्ध करून देता येतील याबाबत दोन ते तीन दिवसांत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन २१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. रहिवासी याबाबत सकारात्मक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही.

  न्यायालयाने घरांसाठी पालिकेकडे अर्ज करण्यास सांगितल्यानंतर सुमारे अडीच हजारांहून अधिक नागरिकांचे अर्ज दाखल झाले आहेत. याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेऊन आतापर्यंत म्हाडाच्या २८८ तर एसआरएच्या सुमारे ५५० घरांमध्ये नागरिकांचे स्थलांतर केले आहे. उर्वरित १६०० प्रकल्पग्रस्तांची यादी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, माहुलमधील प्रदूषण आणि नागरिकांना होणा-या त्रासाबाबत आढावा घेण्यासाठी गुरूवारी ऑनलाइन बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिकेचे अधिकारी तसेच बीपीसीएल, एचपीसीएल, रिफायनरीसह चार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रहिवासी संघटनेला या बैठकीचे निमंत्रण नव्हते.

  या बैठकीत माहुलमधील प्रदूषण कमी करण्यासाठीच्या योजनांचा नियमित अहवाल घेऊन हवेची गुणवत्ता सुधारणे, वृक्षलागवड करणे आणि शाश्वत विकासाचे उपाय राबवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. माहुल प्रकल्पग्रस्त समितीच्या रेखा गाडगे यांनी माहुलमधील प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादात खटला सुरू आहे. लवादाने माहुलमधील प्रदूषण अद्याप कमी झालेले नाही, अशी खंत वेळोवेळी पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे व्यक्त केली आहे. त्याबाबत ही बैठक घेण्यात आली. मात्र आमच्या घरांच्या प्रश्नी चर्चा झाली नाही, अशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

  परिसर पुन्हा हिरवागार व प्रदूषणमुक्त करा

  माहुलमधील प्रकल्पग्रस्त वसाहत हा कांदळवनाचा असलेला भाग तोडून इमारती बांधण्यात आल्या आहेत. येथील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. या ठिकाणी झाडे लावून हा परिसर पुन्हा हिरवागार व प्रदूषणमुक्त करावा. वसाहतीतील इमारतींचा सरकारी गोदामे, ट्रक टर्मिनल किंवा अन्य व्यावसायिक वापरासाठी करावी अशी सूचना प्रकल्पग्रस्त समितीने केली आहे.