गुलाबनंतर आता ‘या’ वादळाचा धोका; महाराष्ट्र आणि गुजरात किनाऱ्यांना IMD चं अलर्ट

गुलाब चक्रीवादळाचा एक भाग बाजूला होऊन तयार झालेल्या शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. गुलाबनंतर आत शाहिनचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

    नवी दिल्ली : सध्या गुलाब चक्रीवादळानं सगळीकडे थैमान घातलं आहे. पुर्व किनारपट्टीवरनंतर आता हे वादळ हळूहळू पश्चिम किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे अनेक भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला जात आहे. अशातच आता गुलाब चक्रीवादळाचा एक भाग बाजूला होऊन तयार झालेल्या शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे.

    गुलाबनंतर आत शाहिनचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. शाहीन नावाचे हे नवीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार नाही. हे 1 ऑक्टोबर रोजी ओमानच्या दिशेने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीपासून दूर जाईल. मात्र यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शाहिन चक्रीवादळामुळे आता हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. के. जेनमानी यांनी म्हटलं की, 3 ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कायम राहिल. त्यामुळे पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

    शाहीन चक्रीवादळाचा धोका असल्याचा अलर्ट

    दरम्यान, ईशान्य अरबी समुद्राला लागून असलेल्या गुजरात किनाऱ्यावर 30 सप्टेंबर संध्याकाळी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शाहीन चक्रीवादळाचा धोका असल्याचा अलर्ट आयएमडीकडून देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 दिवस समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून गुरुवारी रात्रीपर्यंत याचा प्रभाव सर्वाधिक जाणवेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.