‘महाराष्ट्रातच मराठीचे गारदी’ सामनातून विरोधकांवर निषाणा

मुंबईतील गृहसंकुलात मराठी माणसांना घर नाकारणारे व मराठी पाट्यांना विरोध करणारे एकाच राजकीय जातकुळीतले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, राज्याचे अध्यक्ष दादाजी पाटील यांचे मराठी पाट्यांबाबत काय मत आहे? की जे कोणी व्यापारी संघटनेचे भाजपपुरस्कृत पुढारी विरोध करीत आहेत त्यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवावी, म्हणून ते मागणी करणार आहेत?

  मुंबई : सर्वच भाषिक राज्यांत त्या त्या ‘मातृभाषिक’ शाळांसमोर मराठीइतकेच संकट उभे आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे हाच त्यावरचा एक उपाय आहे. ज्ञानेश्वरांपासून शिवाजी महाराजांपर्यंतच्या महान विभूतींची मराठी भाषा अमर आहे. मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या नतद्रष्टांनी ‘मराठी’चा युद्ध इतिहास समजून घ्यावा. नंतर मराठी विरोधकांच्या गोवऱ्या मसणात रचल्यावर रडगाणी गाऊ नयेत! असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विरोधकांवर निषाणा साधण्यात आला आहे.

  काय म्हटलंय सामनात?

  मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्या घरातच आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राज्यातील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या आता मराठीतच असतील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेताच त्यावर महाराष्ट्रातल्या लोकांनीच टीका-टिप्पणी सुरू केली आहे. त्यांनी निदान गप्प तरी बसावे, पण तसे न करता महाराष्ट्रातच मराठीचे गारदी म्हणून ते टीकेच्या तलवारी हवेत फिरवत आहेत.

  मराठी पाट्यांची सक्ती करण्याची गरज काय, इथपासून ते आम्ही हे होऊ देणार नाही इथपर्यंत प्रकरण पोहोचले आहे. मुंबईतील भाजपधार्जिणा असा व्यापारी संघटनेचा अध्यक्ष तर मराठी पाट्यांसंदर्भात आव्हानाची भाषा करतोय. धमक्या देतोय व समस्त भाजपवाले त्यावर पाठीमागची शेपूट सरळ तोंडात कोंबून गप्प बसले आहेत.

  मुंबईतील गृहसंकुलात मराठी माणसांना घर नाकारणारे व मराठी पाट्यांना विरोध करणारे एकाच राजकीय जातकुळीतले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, राज्याचे अध्यक्ष दादाजी पाटील यांचे मराठी पाट्यांबाबत काय मत आहे? की जे कोणी व्यापारी संघटनेचे भाजपपुरस्कृत पुढारी विरोध करीत आहेत त्यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवावी, म्हणून ते मागणी करणार आहेत?

  मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे व मराठीचा सन्मान राहिलाच पाहिजे, अशी भूमिका घेणे यात काय चुकले? शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी अस्मिता, भूमिपुत्रांचे प्रश्न यासाठी झाली. मराठीच्या प्रश्नांवर संमेलने, लढे करायचे व रोज डोळ्य़ांसमोर मराठी पायदळी तुडवली जाताना पाहायचे. त्या तुडवातुडवीस कोणी राष्ट्रीय एकात्मता म्हणत असतील तर ती एकात्मता त्यांची त्यांनाच लखलाभ ठरो.

  देशात संविधानानुसार भाषिक राज्ये निर्माण झाली आहेत. मुंबईसह महाराष्ट्र हे ‘मऱ्हाटी’ राज्य तर झगडून आणि रक्ताचे शिंपण करून मिळवले आहे. महाराष्ट्रास मुंबई मिळावी म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला व मुंबईसह मराठी माणसाचे रक्षण व्हावे म्हणून शिवसेनेची निर्मीती झाली हा इतिहास आहे.

  सर्वच भाषिक राज्यांत त्या त्या ‘मातृभाषिक’ शाळांसमोर मराठीइतकेच संकट उभे आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे व प्रत्येक स्तरावर मराठी भाषा सक्तीची व्हावी हाच त्यावरचा एक उपाय आहे. ज्ञानेश्वरांपासून शिवाजी महाराजांपर्यंतच्या महान विभूतींची मराठी भाषा अमर आहे. मराठी ही श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, तशी योद्धय़ांची भाषा आहे. स्वाभिमानाने लढणाऱ्यांची ही भाषा देशाला प्रेरणा देत राहिली आहे व देत राहील. मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या नतद्रष्टांनी ‘मराठी’चा युद्ध इतिहास समजून घ्यावा. नंतर मराठी विरोधकांच्या गोवऱ्या मसणात रचल्यावर रडगाणी गाऊ नयेत!