Alarm bell for Metro 2B project Juhu Airport Authority! Petition to the High Court

मेट्रो २ ब प्रकल्पामुळे जुहू विमानतळाच्या फनेल झोनला बाधा निर्माण करत असल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेची दखल घेत गंभीर प्रतिवाद्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे तसेच प्रश्नावर जलदगतीने सुनावणी घेण्याचे संकेत खंडपीठाने दिले आहेत.

    मुंबई : मेट्रो २ ब प्रकल्पामुळे जुहू विमानतळाच्या फनेल झोनला बाधा निर्माण करत असल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेची दखल घेत गंभीर प्रतिवाद्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे तसेच प्रश्नावर जलदगतीने सुनावणी घेण्याचे संकेत खंडपीठाने दिले आहेत.

    एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणारा मेट्रो २ ब प्रकल्प मानखुर्द मंडाले ते अंधेरी डी एन नगर असा असणार आहे. ही मेट्रो जमिनीवरून धावणार असून जुहू विमानतळमार्गे एस. व्ही रोडला जोडली जाणार आहे. प्रकल्पाला एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाने २०१७ साली मंजुरी दिली असून कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.

    मात्र, या प्रकल्पामुळे विमानतळाच्या फनेल झोनला बाधा येत असल्याचा दावा करत जुहू येथील सामाजिक कार्यकर्ते हरित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात अँड. निशांत ठक्कर, अँड. जसमीन अमलसादवाला यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

    जुहू विमानतळाच्या रनवे २६ आणि ८ वर उड्डाणांच्या लँडिंग आणि टेक-ऑफसाठी फनेल क्षेत्राची उंची समुद्रसपाटीपासून ३.८९ मीटर उंचीवर असताना एमएमआरडीएला देण्यात आलेल्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे फनेल झोनमध्ये मेट्रो लाईन बांधण्याची परवानगी मिळाली आहे. जी केवळ विमानांच्या ऑपरेशनसाठीच नव्हे तर विमानातून प्रवास कऱणाऱ्या लोकांच्या तसेच आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरणार आहे.

    यामुळे नागरी उड्डाण मंत्रालयाच्या २०१५ नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही याचिकाकर्त्यांकडून खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल सदर प्रकरणावर जलदगतीने सुनावणी घेणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आणि प्रतिवाद्यांना एका आठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देस देत सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी निश्चित केली.