ईडी चौकशीसाठी अनिल देशमुख गैरहजर; चौकशीला हजर होण्यासाठी मागीतला आणखी वेळ

मुंबई आणि नागपुरमधील घरी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केल्यानंतर ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स जारी केले होते. मात्र, देशमुख आज चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. अनिल देशमुख यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी ईडीकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता आणखी वेळ मागितला आहे.

  मुंबई : मुंबई आणि नागपुरात केलेल्या झाडाझडतीनंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावला आहे. देशमुख यांना सकाळी अकरा वाजता मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती मात्र आज ते हजर राहू शकले नाहीत. त्याआधी ईडीने अनिल देशमुख यांचे खाजगी सहायक कुंदन शिंदे आणि खाजगी सचिव संजीव पालांडे यांना अटक केली.

  आजची चौकशी टळली

  मुंबई आणि नागपुरमधील घरी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केल्यानंतर ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स जारी केले होते. मात्र, देशमुख आज चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. अनिल देशमुख यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी ईडीकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता आणखी वेळ मागितला आहे.

  चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितला

  काल संध्याकाळी ईडीच्या कार्यालयात देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री देशमुखांचे संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता अनिल देशमुखांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितल्याने आजची चौकशी टळली आहे.

  यावर ईडीने निर्णय घ्यावा

  आम्ही ईडीला पत्र दिले आहे आणि कोणत्या प्रकरणाबाबत ही चौकशी सुरु आहे. हे आम्हाला माहिती नाही. त्यासाठी माहिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता यावर ईडीने निर्णय घ्यावा, अशी माहिती अनिल देशमुखांचे वकिल अॅड. जयवंत पाटील यांनी दिली आहे.  दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना हवाला प्रतिबंधक कायदा (PMLA) कायद्या अंतर्गत शुक्रवारी रात्री उशिरा अटक करून वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सकाळी दोघांनाही PMLA कोर्टात हजर करण्यात आले.