एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अनिल परब यांची विशेष बैठक, ४ तास ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या (St Workers Strike)पार्श्वभूमीवर आज परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab And Sharad Pawar Meeting)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात साधारण ४ तास बैठक झाली.अनिल परब यांनी बैठकीमध्ये झालेल्या चर्चेविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे(St Workers Strike) काम बंद आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab And Sharad Pawar Meeting)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात साधारण ४ तास बैठक झाली. या बैठकीत परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील हजर होते. अनिल परब यांनी बैठकीमध्ये झालेल्या चर्चेविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

    अनिल परब म्हणाले, “तुम्हाला माहिती आहे की गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं, अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर वेगवेगळे काय मार्ग निघू शकतात. या मार्गाच्या बाबतीत त्यांनी तपासणी केली आणि एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रूळावर येईल त्यासाठी करायच्या उपाययोजना आणि आता संपकरी कामगारांच्या मागण्या यावर त्यांनी आज आमच्याशी सविस्तर चर्चा केली.”

    ते पुढे म्हणाले की, “आम्ही शरद पवारांना सगळी माहिती दिली. यावर त्यांनी देखील सर्व माहितीचा अभ्यास केला आणि याबाबत वेगवेगळे पर्याय कशा पद्धतीने तयार करता येतील किंवा कशा पद्धतीने यातून मार्ग काढून कामगारांचं आणि जनतेचं समाधान करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा आज आमच्यसोबत झालेली आहे.”

    “विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्यामुळे या समितीसमोर सरकारने देखील आपली काय बाजू मांडावी ? याबाबत देखील चर्चा झाली. परंतु विलनीकरणाचा जो मुद्दा आहे यावरच जो अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारू. फक्त हा अहवाल उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातूनच येईल. त्यामुळे विलनीकरणाचा विषय समितीच्या माध्यामातून येईल. परंतु काय बाजू मांडावी ? कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या वेतन वाढीचा विषय आहे. बाकीच्या राज्यात कशा पद्धतीने परिवहन चालतं, त्यांचे पगार काय आहेत? या सगळ्यांचा आज सविस्तर विचार आणि चर्चा आज आम्ही केली आणि वेगवेगळे त्याला पर्याय तयार केले आहेत की कशा पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो.” अशी देखील चर्चा झाल्याचे परब म्हणाले.