मेट्रो रेल्वे सुरक्षा विभागाच्या सुरक्षाविषयक प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत, सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी जाहीर केले तिकीट दर

सिडको नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत चार उन्नत कॉरिडॉर विकसित करत आहे. हे कोरिडॉअर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडले जाणार आहेत. संपूर्ण पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंधर असा ११ किमी लांबीचा असून या प्रकल्पाची किंमत पंधराशे कोटीवरून ४ हजार कोटींवर पोहोचली आहे. यात ११ स्थानके असून; तळोजा येथे देखभालीसाठी एक डेपो आणि पाचनंद आणि खारघर येथे दोन उपकेंद्रे आहेत. सततच्या विलंबानंतर, सिडकोने या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाईन १ पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची नियुक्ती केली होती. मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.

    सिद्धेश प्रधान नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई, पनवेल उरण वासीयांसाठी बहुप्रतिक्षित असलेली मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सिडकोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मेट्रोच्या पहिल्या फेजदरम्यानच्या प्रवासासाठी लागणारे तिकीट दर जाहीर केले आहेत. त्यामुळे लवकरच नवी मुंबई, खारघर, तळोजेकरांचे स्वप्न सत्यात उतरणार असून मेट्रो दृष्टीपथात आली आहे.  मेट्रोच्या पहिल्या फेजसाठीचे दर हे नवी मुंबई परिवहन सेवेपेक्षा देखील कमी आहेत असा दावा सिडकोने केला आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा विभागाचे  सुरक्षाविषयक प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत सिडको असून ते मिळताच मार्ग क्र. १ वरील स्थानक ७ ते ११ दरम्यान सेवा सुरू होणार आहे.

    सिडकोने मेट्रो उभारणीला मोठ्या दिमाखात सुरुवात केली होती. मात्र एक दशकाहून अधिक काळ लोटला असला तरी मेट्रचे काम अपूर्णच आहे. मेट्रो प्रकल्प होणार म्हणून लाखो सामान्य नागरिकांना नवी मुंबई, खारघर, तळोजे येथे घर घेण्यास प्रथम पसंती दर्शवली होती. मेट्रोने अनेक बांधकाम विकासकांना कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवून दिला होता. सिडकोने देखील स्वतःची गृहप्रकल्प योजनेची जाहिरातबाजी करताना मेट्रो स्थानकानाजवळ घरे अशाच पद्धतीने केली होती. मात्र सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प धीम्या गतीने सुरू होता. त्यात कोविडमुळे आणखीन भर पडली होती.

    सिडको नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत चार उन्नत कॉरिडॉर विकसित करत आहे. हे कोरिडॉअर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडले जाणार आहेत. संपूर्ण पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंधर असा ११ किमी लांबीचा असून या प्रकल्पाची किंमत पंधराशे कोटीवरून ४ हजार कोटींवर पोहोचली आहे. यात ११ स्थानके असून; तळोजा येथे देखभालीसाठी एक डेपो आणि पाचनंद आणि खारघर येथे दोन उपकेंद्रे आहेत. सततच्या विलंबानंतर, सिडकोने या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाईन १ पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची नियुक्ती केली होती. मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.

    नवी मुंबईच्या विकासाला चालना मिळणार

    मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होताच, बांधकामांना देखील वेग येऊन नवी मुंबई,पनवेल येथील विकासाला देखील चालना मिळणार आहे. त्यासह रेल्वेसोबत नागरिकांसाठी मेट्रोचा देखील पर्याय निर्माण होणार असून; त्यामुळे  रस्त्यावरील ट्रॅफिक व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वाढलेल्या महागाईत नागरिकांना कमी दरात मेट्रोचा प्रवास अनुभवता येणार आहे.

    सद्यस्थितीत मार्ग क्र.१ वर उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांपैकी १ ते ६ स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविडमुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, या निकषांचा विचार करून सिडकोने पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. सर्वांत योग्य पर्याय म्हणून महा मेट्रोची निवड करण्यात येऊन या मार्गाचे काम महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरस्कर्ता म्हणून सिडको कायम राहणार असून प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महा मेट्रो काम पाहणार आहे.

    सिडकोने जाहीर केले दर

    किमी- ० ते २

    — प्रवासी भाडे रुपये -१०

    किमी- २ ते ४

    — प्रवासी भाडे रुपये -१५

    किमी- ४ ते ६

    — प्रवासी भाडे रुपये -२०

    किमी- ६ ते ८

    — प्रवासी भाडे रुपये -२५

    किमी- ८ ते १०

    — प्रवासी भाडे रुपये -३०

    किमी- १० पेक्षा जास्त

    — प्रवासी भाडे रुपये -४०

    महा मेट्रो कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा १ आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. १ आणि २ च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा अनुभव आहे. यामुळे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ वरील उर्वरित कामांची जलदरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरिता महा मेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. महा मेट्रोने या तज्ज्ञ गटाच्या मदतीने विविध उपक्रमांना प्रारंभ केला आहे. या तज्ज्ञ गटाकरिता तळोजा मेट्रो आगार येथे कार्यालयासाठी जागाही सिडकोने उपलब्ध करून दिली आहे.

    आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएआरएस) यांचे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मार्ग क्र. १ वरील स्थानक ७ ते ११ दरम्यान साधारणत: डिसेंबर २०२१ अखेरीस सेवा सुरू होण्याचा विश्वास सिडको एमडी मुखर्जी यांनी व्यक्त केला होता. स्थानक १ ते ७ दरम्यान साधारणत: डिसेंबर २०२२ अखेरीस वाणिज्यिक परिचालनास (प्रवासी वाहतुकीस) सुरुवात होण्याची शक्यता सिडकोकडून वर्तवण्यात आली आहे.