बावनकुळेंनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, मात्र निवडणुका थांबणार नाहीत, भाजपचे राज्यभरात आंदोलन

भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यानी याबाबत आज मुख्य सचिव आणि राज्य निवडणुक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी आम्ही यूपीएस मदान यांना भेटलो. मात्र तरीही या निवडणुका थांबणार नाही असेच सांगितले आहे.

    मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केल्याने राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुका रद्द करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे अशी मागणी भाजपने केली आहे.

    भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यानी याबाबत आज मुख्य सचिव आणि राज्य निवडणुक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी आम्ही यूपीएस मदान यांना भेटलो. मात्र तरीही या निवडणुका थांबणार नाही असेच सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या निवडणूका घेतल्या जात असल्याने त्यानी यावर स्थगिती दिल्यास त्या थांबल्या जावू  शकतात त्या करीता राज्य सरकारने तातडीने आजच सर्वोच्च न्यायालयात जावे असे बावनकुळे म्हणाले.

    दरम्यान “मुख्य आयुक्तांना या निवडणुका घेऊ नका म्हणून सांगितले आहे. याच धर्तीवर जर महाराष्ट्र सरकार न्यायालयात गेले तर या निवडणुका थांबू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीताराम कुंटे यांनी याचिका दाखल करावी. तरच या निवडणुका थांबवता येतील” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

    दररोज आंदोलन होत राहतील

    बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला ओबीसींची चिंता असेल, तर निवडणुकांसंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा. भाजपकडून २६ जूनला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन एका दिवसात थांबणार नाही, तर दररोज आंदोलन होत राहतील, असेही बावनकुळेंनी सांगितले. न्यायालयात ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम १९ जुलै रोजी मतदान होणार असून २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.