‘साण्डू फार्मास्युटीकल्स’चे अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती भास्करराव साण्डू यांचे निधन

आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केलेल्या भास्करराव साण्डू यांच्या कारकीर्दीतच ‘साण्डू फार्मास्युटीकल्स’चा पसारा कैकपटीने वाढला. कर्मचारीवर्ग चारपटीने वाढला, तर कंपनीचा विस्तार देशापलीकडे अनेक इतर देशांमध्ये झाला, उत्पादन १००० टक्क्यांनी वाढले. चेंबूरचे सुसज्ज कार्यालय, नेरूळ येथील अत्याधुनिक कारखाना, गोव्याचा महाकाय कारखाना या गोष्टी श्री भास्करराव यांच्या काळातच साध्य झाल्या.

    मुंबई : आयुर्वेदिक क्षेत्रातील १२० वर्षाहून अधिक विश्वसनीय परंपरा असलेल्या औषध कंपनी ‘साण्डू फार्मास्युटीकल्स’चे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योगपती भास्करराव गोविंद साण्डू यांचे २१ मे २०२१ रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. तब्बल साठ वर्षे आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात आणि साण्डू फार्मास्युटीकल्स मध्ये कार्यरत असलेले भास्करराव गोविंद साण्डू हे गेली २० वर्षे कंपनीचे अध्यक्ष होते.

    आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केलेल्या भास्करराव साण्डू यांच्या कारकीर्दीतच ‘साण्डू फार्मास्युटीकल्स’चा पसारा कैकपटीने वाढला. कर्मचारीवर्ग चारपटीने वाढला, तर कंपनीचा विस्तार देशापलीकडे अनेक इतर देशांमध्ये झाला, उत्पादन १००० टक्क्यांनी वाढले. चेंबूरचे सुसज्ज कार्यालय, नेरूळ येथील अत्याधुनिक कारखाना, गोव्याचा महाकाय कारखाना या गोष्टी श्री भास्करराव यांच्या काळातच साध्य झाल्या. त्यांच्या कारकीर्दीतच साण्डू फार्माचे इथीकल डिव्हिजन सुरु करत त्यांनी अनेक आयुर्वेदिकेतर डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधांची माहिती देवून त्यांना आयुर्वेदिकाभिमुख बनविले.

    पोद्दार महाविद्यालयामधून वाणिज्य पदवी घेतलेले भास्करराव ‘जमनालाल बजाज इंस्टीट्युट ऑफ मनेजमेंट’च्या पहिल्या बॅचचे विध्यार्थी होते. वडील गोविंदराव साण्डू यांच्या आदेशानुसार १ जानेवारी १९६० रोजी वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी साण्डू फार्मास्युटीकल्सच्या विपणन विभागामधून कामाला सुरुवात केली. आपल्या कामात दाखवलेल्या कौशल्यामुळे कंपनीची प्रगती होत गेली आणि भास्करराव लवकरच कंपनीचे संचालक झाले. त्यांच्या काळातच गोवा येथे कारखाना उभारणीचे काम सुरु झाले आणि त्यानंतर मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर कंपनीची नोंदणी झाली. हे टप्पे कंपनीच्या प्रगतीमध्ये अत्यंत मोलाचे होते आणि ते भास्कररावांच्या कारकिर्दीत गाठले गेले होते.

    भास्करराव हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात ‘मिस्टर पोद्दार’ ठरले होते. त्यांना सुदृढ म्हणजे फीट राहण्याची आवड होती. ते पॉवरलिफ्टर होते. ते स्वतः नेहमी सुदृढ राहत आणि इतरांनी तसेच असावे असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या निधनाने साण्डू कुटुंबीय तसेच साण्डू फार्मास्युटीकल्स परिवार शोकसागरात बुडाला आहे.

    Bhaskarrao Sandu President of Sandu Pharmaceuticals and eminent industrialist passed away