अनैतिक संबंधातून बिहारच्या तरुणाचा मुंबईत खून; युनिट ५ ने चौघांना ठोकल्या बेड्या

पत्नीसोबत अनैतिक संबंध (Immoral relationship) असलेल्या बिहारच्या तरुणाला मुंबईत बोलावून खून करणाऱ्या पती सुरेंद्र मंडल (२०) व साथीदार शंभू सदाय (३०), रामकुमार सदाय (२३, तिघेही रा. बिहार), विजयकुमार मिस्त्री (५०, रा. कर्नाटक) यांना अटक करण्यात आली.

  मुंबई (Mumbai).  पत्नीसोबत अनैतिक संबंध (Immoral relationship) असलेल्या बिहारच्या तरुणाला मुंबईत बोलावून खून करणाऱ्या पती सुरेंद्र मंडल (२०) व साथीदार शंभू सदाय (३०), रामकुमार सदाय (२३, तिघेही रा. बिहार), विजयकुमार मिस्त्री (५०, रा. कर्नाटक) यांना अटक करण्यात आली. सदर कारवाई क्राईम ब्रँच युनिट-५ च्या पथकाने बिहार, कर्नाटक राज्यात केली.

  चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाचा सांगाडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील पाण्याच्या टाकीतून बाहेर काढण्यात आल्याचे तपासी पथकाने सांगितले.

  मूळ बिहार राज्यात राहणाऱ्या राजेश चौपाल (२३) हा बेपत्ता झाल्याप्रकरणी १६ मे रोजी ओश्विरा पोलीस ठाण्यात मीसिंगची नोंद करण्यात आली. राजेश हा बिहारहून मुंबईत रेल्वेने आला होता. त्यामुळे सदर गुन्हा आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रँच ५ चे पथक करू लागले. तपासादरम्यान युनिट ५ च्या पथकाला महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार युनिट ५ चे पथका तात्काळ बिहार व कर्नाटक राज्यात दाखल झाले. सापळा लावून सुरेंद्र मंडल, शंभू सदाय, रामकुमार सदाय यांना बिहारमधून तर विजयकुमार मिस्त्री याला कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आले.

  सदर गुन्ह्याची उकल युनिट ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जयदीप जाधव, पोउनि चिंचोलकर, सपोउनि यादव, सोनहिवरे, न्यायनिर्गुणे, हवालदार राणे, वायंगणकर, पैगंणकर, देसाई, घाडगे, वाबळे, शिरसाठ, विचारे, वैंगुर्लेकर, पोना घागरे, सिंग, जावळे, शिंदे, साळवी, फुंदे, काळे, मुलानी, सपोउनि घोरपडे, मालुसरे, पोना कांबळे आदी पथकाने केली.

  पत्नीसोबत अनैतिक संबंधामुळे खून
  राजेश चौपाल याचे मुख्य आरोपी सुरेंद्र मंडल याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्याची गावात बदनामी झाली. याचा वचपा काढण्यासाठी त्याने राजेशच्या खुनाचा कट रचला. त्याला मुंबईत बोलावून घेतले. त्यानुसार १४ मे रोजी राजेश मुंबईत दाखल झाला. सुरेंद्र याने राजेश याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातल्या अकबर अली ट्रॅव्हल्स समोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नेले.

  तेथे सुरेंद्र याने साथीदार शंभू सदाय, रामकुमार सदाय, विजयकुमार मिस्त्री यांच्या मदतीने राजेशच्या डोक्यात लोखंडी घनाने हल्ला केला व चाकूने गळा चिरला. एवढ्यावर न थांबता त्यांनी राजेशला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. त्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून २५ किलो मीठ त्यात टाकले, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे.