अग्निशमनदल कर्मचाऱ्यांच्या खासगी वैद्यकीय तपासणीवर कोट्यवधीची उधळण; BMC हॉस्पीटल डावलून खासगी रुग्णालयात तपासणी

मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचारी यांची पालिका रूग्णालयामार्फत दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे शक्य असताना पालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा, खर्चिक बाब अशी काही तकलादू कारणे देत खासगी रुग्णालयामार्फत वैद्यकीय तपासणी करण्याचा सपाटा सुरू केला आहे(Billions spent on private medical examinations of firefighters; Examination at a private hospital across BMC Hospital).

  मुंबई : मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचारी यांची पालिका रूग्णालयामार्फत दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे शक्य असताना पालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा, खर्चिक बाब अशी काही तकलादू कारणे देत खासगी रुग्णालयामार्फत वैद्यकीय तपासणी करण्याचा सपाटा सुरू केला आहे(Billions spent on private medical examinations of firefighters; Examination at a private hospital across BMC Hospital).

  त्यामुळे पालिकेला दरवर्षी अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वैद्यकीय तपासणीवर प्रत्येकी ३,६०० ते ३,९०० रुपये प्रमाणे दरवर्षी ७२ ते ७८ लाख रुपये खर्च करावा लागतो आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

  काळबादेवी येथील आग दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या कार्यकुशल अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेच्या तपासासाठी नियुक्त सत्यशोधन समितीने अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी ( ४५ वर्षे पूर्ण) यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्याची शिफारस केली होती. प्रथम पालिकेच्या नायर, सायन, केईएम रूग्णालयामार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र कदाचित कंत्राटदार व अधिकारी यांची डाळ अगोदरच शिजली असावी.

  संबंधित अधिकाऱ्यांनी पालिका रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीसाठी प्रति व्यक्ती ३ तास वेळ याप्रमाणे ७ -८ महिन्यांचा वेळ वाया जात असल्याची आणि कर्मचाऱ्यांना अतिकालीक भत्ता द्यावा लागत असल्याने ही बाब खूप खर्चिक असल्याची कारणे अधिका-याने दिली. त्यामुळे खासगी रुग्णालयामार्फत वैद्यकीय तपासणी करण्याचे व खासगी कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी टेंडर प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार ‘मे..अपोलो क्लिनिक’ या कंत्राटदाराला टेंडरमध्ये सामील करून घेण्यात आले.

  या कंत्राटदाराला सन २०१६ पासून ते आजपर्यंतची सर्व कंत्राटकामे मिळत आहेत. आता २०२१ ते २०२३ या तीन वर्षांचे कंत्राटकामही याच कंत्राटदाराला दिले जाणार आहे.

  २०१६ -१७ या वर्षासाठी मे.अपोलो क्लिनिक’ या कंत्राटदाराला प्रति कर्मचारी (४० वर्षे पूर्ण) ३ हजार रुपये या दराने कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर त्यानंतर पुन्हा २०१८ ते २०२० या ३ वर्षांसाठीसुद्धा टेंडर प्रक्रियेत याच कंत्राटदाराला प्रति कर्मचारी ३,९०० रुपये एवढे कमी दर दाखवल्याच्या नावाखाली कंत्राट कामाची लॉटरी लागली होती. त्यावेळी पालिकेने या कंत्राटदाराला प्रति वर्षी ६६ लाख ३० हजार रुपये प्रमाणे ३ वर्षांत १कोटी ९८ लाख ९० हजार रुपये अदा केले.

  आणखी ३ वर्षांसाठी २ कोटीचे कंत्राट

  टेंडर प्रक्रियेत पुन्हा याच कंत्राटदाराला लॉटरी लागली. एकूण २ हजार अधिकारी , कर्मचारी ( ३५ वर्षे पूर्ण) यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी प्रत्येकी ३,६०० ते ३,९०० रुपये याप्रमाणे सन २०२१ ते २०२३ या ३ वर्षांसाठी २ कोटी २२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये वैद्यकीय तपासणी, चहापान यांचा खर्च समाविष्ट आहे. मात्र २०२१ व २०२२ या २ वर्षांसाठी प्रत्येकी ३,६०० रुपये तर २०२३ या वर्षांसाठी ३,९०० रुपये दर ठरविण्यात आले आहे. कर्मचारी संख्या वाढवून देण्यासाठी व कंत्राटदाराला लाभ पोहोचवण्यासाठीच ही वयोमर्यादाही ४० वरून ३५ वर आणल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.