देवेंद्र फडणीवसांचा नामोल्लेख वांद्रे कलानगर उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रम पत्रिकेवर नसल्याने भाजपचा बहिष्कार : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

राज्याच्या राजकारणात असे कधी झाले नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून असा चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रकार महाविकास आघाडीने सुरु केला आहे, असा आरोप दरेकरांनी केला.  मुंबईच्या विकासाचे काही कार्यक्रम अलीकडच्या काळात पार पडले. त्यामध्ये जाणीवपूर्वक विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला नाही.

    मुंबई: वांद्रे कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूलाच्या लोकार्पण सोहळ्याचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण करताना एमएमआरडीएच्या कार्यक्रमपत्रिकेत विरोधीपक्षनेते देवेद्र फडणवीस यांचे नाव वगळण्यात आल्याचे सांगत भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. फडणवीस यांचे मुंबई महानगर प्राधिकरणाच्या या कामात महत्वाचे योगदान होते त्यांचे नाव वगळणे राज्याच्या राजकीय परंपरेला हे न शोभणारे आहे अशी टिका करत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या कृतीचा तीव्र निषेध नोंदवत आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

    कार्यक्रमांना निमंत्रण देणे गरजेचे
    कलानगर जंक्शन येथील सागरी सेतूकडून बांद्रा संकुलच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या संदर्भात बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारवर टिका केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मुंबईच्या विकासासाठी दिवस रात्र परिश्रम घेतले. मध्यरात्री २ ते ३ वाजता देखील देवेंद्र फडणवीस यांनी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या. मुंबईच्या विकासकामाचे महाविकास आघाडीने श्रेय घ्यावे, मात्र ज्यांनी पाया रचला किंबहुना प्रकल्प पूर्णत्वास नेला त्यांना कार्यक्रमांना निमंत्रण देणे गरजेचे होते असे दरेकर म्हणाले.

    चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रकार
    राज्याच्या राजकारणात असे कधी झाले नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून असा चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रकार महाविकास आघाडीने सुरु केला आहे, असा आरोप दरेकरांनी केला.  मुंबईच्या विकासाचे काही कार्यक्रम अलीकडच्या काळात पार पडले. त्यामध्ये जाणीवपूर्वक विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला नाही. निमंत्रण पत्रिकेमध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते यांचे नाव आहे, परंतु विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याचे  नाव नसल्यामुळे मी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असे ते म्हणाले.

    मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनावरही बहिष्कार
    मालाड आणि कांदिवली येथील मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला होता. आमचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी आंदोलन केले. राज्य सरकारची मनमानी या ठिकाणी सुरू आहे “हम करे सो कायदा” अशी कृती राज्य सरकारची सुरु असल्याची, खंत दरेकर यांनी व्यक्त केली.