स्विगी,डॉमिनोझ आणि झोमॅटो यांना मुंबई पालिकेचे परवाने घेणे बंधनकारक करा – भाजपची मागणी

स्विगी (Swiggy), डॉमिनोझ (Domino's), झोमॅटो (Zomato) यासारख्या सर्व आस्थापनांना महानगरपालिकेच्या थेट नियंत्रणात आणण्याकरता महानगरपालिकेकडून विशिष्ठ अटी व शर्तीसापेक्ष परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी भाजपने(BJP Demand) केली आहे.

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) कार्यक्षेत्रात ऑनलाईनद्वारे मागणीनुसार उपाहारगृहांतील अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या स्विगी(Swiggy), डॉमिनोझ(Domino’s), झोमॅटो(Zomato) यासारख्या सर्व आस्थापनांना महानगरपालिकेच्या थेट नियंत्रणात आणण्याकरता महानगरपालिकेकडून विशिष्ठ अटी व शर्तीसापेक्ष परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.

    भाजपच्या नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी या विषयावर ठरावाच्या सुचनेद्वारे या कंपन्यांना परवाने घेणे बंधनकारक करण्यात ही मागणी केली आहे. मुंबईत स्विगी, डॉमिनोझ , झोमॅटो अशा आस्थापना ऑनलाईनद्वारे नागरिकांच्या मागणीनुसार उपहारगृहांतील अन्नपदार्थ विहित वेळेत घरपोच पुरवितात. मात्र अशा आस्थापनांवर महानगरपालिकेचे कोणतेही थेट नियंत्रण नाही. या आस्थापनांचे वितरण करणारे कर्मचारी विहित वेळेस अन्न पोहचविण्याकरता स्वतःच्या व पादचाऱ्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या दुचाकी रस्त्यांवरून भरधाव नेतात.

    मुंबईतील ठिकठिकाणी उपाहारगृहांच्या बाहेर या आस्थापनांचे वितरण करणारे कर्मचारी घोळक्याने उभे असतात. शिवाय त्यांच्या दुचाकी रस्त्यांवर वेड्यावाकड्या उभ्या करत असल्याचे आढळून येते . परिणामी नागरिकांना तेथून ये – जा करण्यास गैरसोयीचे होते आणि वाहनांची कोंडी होते. स्वत:च्या आर्थिक नफ्यासाठी याआस्थापना मुंबईतील करदात्यांच्या पैशातून महानगरपालिकेने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांचा गैरफायदा घेत असतात. एकंदरीत स्विगी, डॉमिनोझ, झोमॅटो अशा ऑनलाईनद्वारे कार्यरत असणाऱ्या आस्थापनांवर स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिकेचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर कोणताही अंकुश नाही , म्हणून त्यांना पालिकेचे परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी केली आहे.