chitra wagh and sanjay rathod

संजय राठोड यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप झालेला असतानाही राठोड यांच्याविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असा आरोप करणारी याचिका भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

    मुंबई : पुण्यात फेब्रुवारी महिन्यात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून झालेल्या तरूणीच्या मृत्यूप्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

    टिकटॉक व्हिडोओसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील तरूणीचा ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील एकूणच वातावरण ढवळून निघाले होते. राज्यातील राजकारणात एकच गदारोळ निर्माण झाला. त्यातच सदर तरूणीचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी नावं जोडले गेले. तसेच तिच्या राठोड यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाच्या ११ ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर पसरविण्यात आल्या होत्या. संजय राठोड यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप झालेला असतानाही राठोड यांच्याविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असा आरोप करणारी याचिका भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

    त्यावर बुधवारी न्या. सुनिल देशमुख आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, सदर प्रकरणात `त्या` तरूणीच्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नसतानाही याचिकाकर्त्यां कोणत्या उद्देशाने तक्रार दाखल करा असे सांगत आहेत असा सावल यावेळी राज्य सरकारच्या वतीने उपस्थित करण्यात आला. तेव्हा, दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने राज्य सरकारला याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.