
कँन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी शंभर सदनिका देण्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय स्थगित केल्यानंतर २४ तासांत मुख्यमंत्र्याना त्यांचा निर्णय बदलावा लागला. उध्दव ठाकरे यांच्या या यू टर्न राजकारणामागे आव्हाड आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुमारे दोन ते अडीच तास गुप्त बैठक असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : कँन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी शंभर सदनिका देण्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय स्थगित केल्यानंतर २४ तासांत मुख्यमंत्र्याना त्यांचा निर्णय बदलावा लागला. उध्दव ठाकरे यांच्या या यू टर्न राजकारणामागे आव्हाड आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुमारे दोन ते अडीच तास गुप्त बैठक असल्याचे सांगितले जात आहे.
पर्यायी घरांचा प्रस्ताव देत नाराजी दूर
दोन दिवसांपूर्वीच उध्दव ठाकरे यांनी शिवडी येथे टाटा रूग्णालयात येणा-या रुग्णांच्या नातेवाईकासाठी निवारा देण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली होती. या स्थगितीनंतर लगेच दुस-याच दिवशी ठाकरे यानी आव्हाड यांना बोलावून घेत पर्यायी घरांचा प्रस्ताव देत त्यांची नाराजी दूर केल्याचे आव्हाड म्हणाले होते. मात्र त्या मागच्या २४ तासांत आव्हाड यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या घरासंदर्भात बैठकीत चर्चा
याबाबत अशी माहिती आता देण्यात येत आहे की, फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आव्हाड यांना बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, राजकीय वर्तुळात या भेटीवरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सरनाईकांच्या विरोधात भाजपला रसद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाड यांचे ठाण्यातील प्रतिस्पर्धी प्रताप सरनाईक सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यांमुळे त्यानी मुख्यमंत्र्याना भाजपशी जुळवून घेण्याची मागणी पत्र पाठवून केली होती. आव्हाड यांच्याबाबत त्या पत्रात शिवसेनेला ठाण्यात कमकुवत करत असल्याचा आक्षेप सरनाईक यांनी घेतला होता. त्यामुळे फडणवीस यांना भेटून आव्हाड यांच्या कडून नव्याने काही रसद सरनाईक यांच्या विरोधात भाजपला पुरविण्यात आली असावी अशी माहिती याबाबत सूत्रांनी दिली आहे.