बुस्टर डोस व लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप सूचना नाहीत, मुंबई महापालिकेची माहिती

नागरिकांना बुस्टर डोस (Corona Vaccine Booster Dose) देण्याबाबत तसेच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत(Vaccination Of Small Children) अद्याप कोणत्याही सूचना केंद्र सरकारने दिलेल्या नाहीत. केंद्र सरकारने सूचना केल्यास त्यासाठी पालिका तयार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.

    मुंबई : कोरोना(Corona) विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण(Vaccination) सुरु आहे. लसीच्या दोन डोसनंतर नागरिकांना लसीचा बुस्टर डोस(Corona Vaccine Booster Dose) दिला जाईल, अशी चर्चा आहे. पालिकेने टास्क फोर्सशी(Task Force) याबाबत चर्चा केली असून केंद्र सरकारला विनंती करण्यास सांगितले आहे. मात्र नागरिकांना बुस्टर डोस देण्याबाबत तसेच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणत्याही सूचना केंद्र सरकारने दिलेल्या नाहीत. केंद्र सरकारने सूचना केल्यास त्यासाठी पालिका तयार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी(Suresh Kakani) यांनी दिली.

    मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. या लसीकरण मोहिमेला एक वर्ष होणार आहे. यामुळे ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्याला कालावधी झाला असल्याने लाभार्थ्यांना तिसरा बुस्टर डोस दिला जाईल अशी चर्चा आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता, टास्क फोर्स सोबत बुस्टर डोस बाबत चर्चा झाली आहे. केंद्र सरकारला याबाबत सूचना करण्यास टास्क फोर्स आणि राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. मात्र बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत अशी माहिती काकाणी यांनी दिली.

    मुंबईत १०१ टक्के लसीचा पहिला डोस तर ७० टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आला आहे. २२ ते २५ लक्ष नागरिकांना लसीचा दुसरा डोस देणे बाकी आहे. पालिकेकडे सध्या १० लाख लसीचे डोस असून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण केंद्र बंद केली जाणार नाहीत. या लसीकरण केंद्रावर येत्या काळात सरकारने मंजुरी दिल्यास लहान मुलांचे लसीकरण केले जाईल असे काकाणी यांनी सांगितले.

    लहान मुलांच्या लसीकरणाबाबत ट्रायल सुरु आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि आयसीएमआरने काही लस बनवणाऱ्या कंपन्यांना परवानगी दिली आहे. सध्या लहान मुलांवर ट्रायल सुरु असल्या तरी केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिलेली नाही. सरकारकडून परवानगी आणि मार्गदर्शक सूचना मिळताच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. लस देण्यासाठी लागणाऱ्या सिरिंज आणि इतर वस्तू यांची माहिती सरकारने दिल्यावर तसे बदल करून तीन दिवसात लहान मुलांचे लसीकरण राबवता येईल असे काकाणी यांनी सांगितले.