बाहेरगावी जाऊन आलेल्या लोकांनी मुंबईत आल्यावर करावी कोरोना टेस्ट, पालिकेकडून आवाहन

‘कोविड - १९’ या साथ रोगाचा पहिला रुग्ण(Corona Patient) मुंबई महानगरपालिका(BMC) क्षेत्रात मार्च २०२० मध्ये आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिका विविध स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात आहे. याच उपाययोजनांमध्ये कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

  मुंबई :कोणत्याही कारणास्तव बाहेर गावी जाऊन आलेल्या मुंबईकरांनी(Mumbai) कोविड चाचणी (Corona Test)करून घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने(BMC Appeal For Corona Test) केले आहे. कोविड साथरोगाच्या प्रसारास आळा घालण्याच्या उपाययोजनांचा एक प्रमुख भाग म्हणजे कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या हा आहे.

  मुंबईत मार्च २०२० पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांचा एक कोटींचा टप्पा पार केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ५९ हजार २५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

  ‘कोविड – १९’ या साथ रोगाचा पहिला रुग्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२० मध्ये आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिका विविध स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात आहे. याच उपाययोजनांमध्ये कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचे कारण म्हणजे कोविड या संसर्गजन्य रोगाची बाधा झाल्याचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. ज्यामुळे बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो. हीच बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन कोविड विषयक चाचणी करून घेण्याबाबत महानगरपालिका सातत्याने जनजागृती करीत आहे आणि नियमितपणे चाचण्या देखील करीत आहेत.

  महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये आणि निर्धारित केंद्रांमध्ये या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत.सध्या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २६० पेक्षा अधिक चाचणी केंद्रे (नमुना संकलन केंद्रे) विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच बरोबर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये देखील या चाचण्या करण्यात येत आहेत. या सर्व चाचण्यांचे निकाल हे चाचणीचा निकाल आल्यापासून २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे गरजेचे आहे.

  महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २६० चाचणी केंद्रांवर कोविड विषयक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येते. या केंद्रांचे पत्ते महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधल्यानंतर देखील आपल्या नजीकच्या चाचणी केंद्राचा पत्ता मिळू शकतो.

  कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी किंवा बाधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविड चाचणी करवून घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाऊन परतलेल्या किंवा अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाऊन परत आलेल्या व्यक्तींनी आपली कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी. ज्यामुळे वेळीच निदान झाल्यामुळे वेळच्या वेळी औषध उपचार मिळण्यासह संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवल्यामुळे त्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. तरी या अनुषंगाने कोविड विषयक वैद्यकीय चाचणी वेळच्या वेळी करवून घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.