मुंबई महापालिका अभियंत्यांच्या बढतीला अखेर मुहूर्त,पालिका सभागृहात शिक्कामोर्तब

गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून मुंबई महापालिकेच्या(BMC) अभियंत्यांच्या बढतीचा प्रस्ताव महासभेत(Mahasabha) प्रलंबित होता. या बढतीच्या प्रस्तावाला पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे.

    मुंबई: मुंबई महापालिकेच्या(BMC) तब्बल १३२ अभियंत्यांच्या बढतीला(Promotion Of Engineers) अखेर मुहूर्त सापडला आहे. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून हा प्रस्ताव महासभेत(Mahasabha) प्रलंबित होता. या बढतीच्या प्रस्तावाला पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे.

    महापालिकेच्या १०५ सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता तर २६ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. मात्र यावर चर्चा केली जात नव्हती. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली जात होती. यापूर्वी अभियंत्यांच्या बढतीचे प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेतला जात होता. मात्र हा प्रस्ताव रखडवण्यात आल्याने विरोधी पक्षाकडून शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. काही अभियंते निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. यातील काही अभियंते वर्षभरात तर अनेक अभियंते दोन-तीन वर्षांत निवृत्त होतील. त्यामुळे प्रस्ताव रखडल्यास अनेकांना बढती न मिळताच निवृत्त व्हावे लागले असते. याबाबत म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन व इतर संघटनांनी यावर आवाज उठवला होता. या प्रस्तावावर महासभेत मंजुरी मिळाल्याने बढतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.