मुंबई महापालिकेची मोठी कारवाई – महालक्ष्मी स्टेशनची अडथळा ठरणारी १४ बांधकामे जमीनदोस्त

पश्चिम रेल्वे(Western Railway) मार्गाच्या वरून जाणाऱ्या या १.२ किलोमीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारी पहिल्या टप्प्यातील १४ बांधकामे (14 Constructions Demolished By BMC)मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने केलेल्या धडक कारवाईत जमीनदोस्त केली.

    मुंबई : महालक्ष्मी रेल्वे स्टेशन (Mahalaxmi Railway Station)लगतच्या परिसरातील आणि संत गाडगे महाराज चौक परिसरातील वाहतूक कोंडी(Traffic Jam) सुटावी या उद्देशाने रेसकोर्स जवळील केशवराव खाड्ये मार्गापासून संत गाडगे महाराज चौकापर्यंत एक नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे(Western Railway) मार्गाच्या वरून जाणाऱ्या या १.२ किलोमीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारी पहिल्या टप्प्यातील १४ बांधकामे (14 Constructions Demolished By BMC)मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने केलेल्या धडक कारवाईत जमीनदोस्त केली.शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमुळे प्रस्तावित पुलाचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू आणि परिमंडळ – २ चे उपायुक्त  हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘जी दक्षिण’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान प्रस्तावित रेल्वेवरील पुलाच्या रेषेत येणारी बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर पुलाच्या बांधकामासाठी व पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणारी खुली ज़मीन देखील या कार्यवाही दरम्यान संपादित करण्यात आली आहे.

    ही कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागातील ३५ कामगार – कर्मचारी – अधिकारी रात्री उशिरापर्यंत कार्यरत होते. तसेच ही कारवाई शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पाडावी, यासाठी मुंबई पोलीस दलाचे कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात होते. या कारवाईसाठी १ जेसीबी, १ पोकलेन यासह आवश्यक ती वाहने व यंत्रसामग्री देखील वापरण्यात आली. जी बांधकामे पाडण्यात आली आहेत, त्यापैकी पात्रता धारकांना पर्यायी जागा देण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे, अशीही माहिती ‘जी दक्षिण’ विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर झांबरे यांनी दिली आहे.