मुंबई महापालिकेत कंत्राटदारांचं चांगभलं – वृक्ष छाटणी, फांद्या उचलण्यासाठी ७ कोटींचे अतिरिक्त कंत्राट

वृक्ष छाटणी, (Tree Cutting In Mumbai) फांद्या उचलण्यासाठी जून २०१९ मध्ये दोन वर्षांसाठी प्रत्येक विभागात कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा १५ ते २५ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवून कंत्राटदारांनी हा ठेका मिळवला होता.

    मुंबई :धोकादायक झाडांची छाटणी करणे (Tree Cutting), पावसाळ्यात पडलेली झाडे उचलून त्याची विल्हेवाट लावणे अशा कामांसाठी मुंबई पालिकेने (BMC) ७४ कोटी रुपये खर्च करून कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. या खर्चात आता अतिरिक्त सात कोटी रुपयाची वाढ (7 Crores More For Tree Cutting In Mumbai) झाली आहे. या संदर्भातील प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र हा अतिरिक्त खर्च गेल्या वर्षी आलेल्या तौक्ते वादळामुळे वाढला आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

    वृक्ष छाटणी, फांद्या उचलण्यासाठी जून २०१९ मध्ये दोन वर्षांसाठी प्रत्येक विभागात कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा १५ ते २५ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवून कंत्राटदारांनी हा ठेका मिळवला होता. या कंत्राटाची मुदत जून २०२१ मध्ये संपणार होती. त्यानंतर नव्या कंत्राटदारांची नियुक्ती होणे गरजेचे होते. मात्र, त्याच काळात तौक्ते वादळामुळे तब्बल ३ हजार ५७ झाडे, फांद्या पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ही झाडे, फांद्या उचलण्यासाठी नव्या कंत्राटदारांची नियुक्ती झाली नसल्याने कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही जुन्याच कंत्राटदारांकडून ही कामे करण्यात आली. यामुळे पालिकेला ७ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागला असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

    मुंबईत प्रत्येक विभागानुसार धोकादायक झाडे कापणे , झाडांची निगा राखणे अशा कामांसाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी ९५ कोटी ३६ लाखांचा खर्च अंदाजित केला होता. मात्र, कंत्राटदारांनी ७४ कोटी ६५ लाख रुपयात हे काम करण्याची तयारी दाखवली. हे कंत्राट जून २०२१ मध्ये संपले मात्र पावसाच्या तोंडावर नवे कंत्राटदार मिळत नसल्याने याच कंत्राटदारांकडून कामे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी जुन्याच कंत्राटदाराला काम दिल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.