कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई पालिका सज्ज, रुग्णसंख्या वाढल्यास बेड्स वाढवण्याची तयारी

मुंबईतील ओमायक्रॉनच्या (Omicron In Mumbai) शिरकावाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. तिसऱ्या लाटेला (BMC Ready To Tackle Corona Third Wave) रोखण्यासाठी पालिकेने कोव्हिड सेंटर, बेड्स तयार ठेवले आहेत.

  मुंबई: मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ तसेच ओमायक्रॉनचा (Omicron In Mumbai) झालेला शिरकाव या पार्श्वभूमीवर पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. तिसऱ्या लाटेला (BMC Ready To Tackle Corona Third Wave) रोखण्यासाठी पालिकेने कोव्हिड सेंटर, बेड्स तयार ठेवले आहेत. सध्या मुंबईत १० जम्बो सेंटर असून त्यात १६ हजार बेड्स आहेत. यातील पाच जम्बो सेंटर सुरु असून त्यावर ५ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास आवश्यकतेनुसार बेड्स उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

  मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आले असले तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. निर्बंधात शिथीलता दिल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढते आहे. विना मास्क फिरणाऱ्यांची तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे समोर आले आहे. सध्या कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या काहीशी वाढत असताना ओमायकॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा मुंबईत शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

  तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत १० जम्बो सेंटर आहेत. यातील सध्या वरळी, नेस्को , बीकेसी, भायखळा, मुलुंड हे पाच सेंटर सुरु ठेवण्यात आले आहेत. १० जम्बो सेंटरमध्ये १६ हजार बेड्स उपलब्ध आहेत. सध्या सुरु असलेल्या पाच जम्बो सेंटरमध्ये फक्त पाच टक्के रुग्ण असून ते उपचार घेत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. रुग्ण वाढल्यास सर्व रुग्णालयात बेड्सची संख्या एक लाखापर्यंत वाढवण्याची तयारी पालिकेने केली आहे.

  मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मागील पावणे दोन वर्षांपासून कोरोनाशी लढा सुरु आहे. पहिल्या लाटेवर नियंत्रण आल्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोनाची दुसरी लाट धडकली. या लाटेत ३३४ वर असलेली रुग्णसंख्या झपाट्याने वाढून दिवसाला ११ हजारावर पोहचली. वाढलेल्या रुग्णांमुळे पालिकेची आरोग्य सेवेवर ताण आला. रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमी पडू लागल्याने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याची वेळ आली. मात्र कडक निर्बंधांमुळे तसेच राज्य व पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनावर नियंत्रण आले. सद्या मुंबईतील रुग्णसंख्या अडीच ते तीनशेच्या दरम्यान होत आहे. १ डिसेंबरला ही संख्या १०८ वर आली होती. मात्र आता ही संख्या तीनशेच्या वर गेली आहे. थर्टी फर्स्ट, नाताळ तसेच लग्न समारंभाला वाढणारी गर्दी लक्षात घेऊन लक्षात घेऊन पालिकेने सुधारित नियमावलीही जारी केली आहे.

  दिवसाला एक लाखापर्यंत लसीकरणाचे लक्ष्य
  कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. सध्या दिवसाला ३० ते ५० हजारापर्यंत लसीकरण केले जाते. पुरेसा लस उपलब्ध झाल्यास ही संख्या दिवसाला वाढवले जाणार आहे.

  एक लाख खाटा उपलब्ध करणार
  दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यानंतर खाटांची संख्या कमी पडली. त्यानंतर रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये खाटांची संख्या पालिकेने वाढवली. सध्या पालिका रुग्णालयात १६ हजार खाटा उपलब्ध आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि खासगी रुग्णालयात खाटांची संख्या एक लाखांपर्यंत वाढवण्याची तयारी पालिकेची आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्याठी खाटासंह व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी यंत्रणा पालिकेने सज्ज ठेवली आहे.

  सध्या ५ टक्के बेड्स रुग्णांनी व्यापलेले
  मुंबईत १६ हजार बेड्स उपलब्ध आहेत. १० पैकी वरळी, नेस्को, बीकेसी, भायखळा, मुलुंड हे पाच कोव्हिड सेंटर सध्या सुरु आहेत. यातील पाट टक्के बेड्स रुग्णांनी व्यापलेले आहेत. रुग्ण वाढल्यास बेड्सची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.