अनंत चतुदर्शीला होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी मुंबई पालिका सज्ज, अधिक माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

अनंत चतुर्दशीला(Anant Chaturdashi 2021) गणेश विसर्जनासाठी(Ganesh Immersion In Mumbai) मुंबई पालिका(Bmc) सज्ज झाली आहे.

    मुंबई: अनंत चतुर्दशीला(Anant Chaturdashi 2021) गणेश विसर्जनासाठी(Ganesh Immersion In Mumbai) मुंबई पालिका(Bmc) सज्ज झाली आहे. त्यासाठी सर्व विसर्जन स्थळांवर जीवरक्षक,आरोग्य व नियंत्रण कक्ष, निर्माल्य कलश, फ्लड लाईटसह अग्निशमन दल तसेच पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे.

    दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन आतापर्यंत तरी निर्विघ्नपणे पार पडले आहे. आता अनंत चतुर्दशी दिनी येत्या १९ सप्‍टेंबर रोजी दहा दिवसांच्या श्रीगणेश मूर्तीला गणेश भक्त, गणेश मंडळे भावपूर्ण वातावरणात व विधिवत पूजाअर्चा करून नैसर्गिक व कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी निरोप देणार आहेत.

    मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल, संबंधित अतिरीक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या आदेशाने, उप आयुक्त (परिमंडळ – २) तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने, गणेश मूर्ती विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली आहे. मुंबई महापालिकेने दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी शहर व उपनगरे येथील सर्व २४ विभागांमध्ये साधारणपणे २५ हजार कामगार अधिकारी यांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती उप आयुक्त हर्षद काळे यांनी दिली आहे.

    पालिकेने १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली असून, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळे देखील कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त पालिका क्षेत्रातील ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळीही विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. मुंबईतील गिरगाव, दादर, माहिम आदी चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्‍थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विसर्जनासाठी येणारी वाहने समुद्र किनाऱ्यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत, यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत.

    विविध ठिकाणी ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा आणि साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था केली आहे.

    कोरोनाच्या कालावधीत विसर्जनाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

    पालिकेचे आवाहन
    घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्‍यक्तिंनी ‘कोरोनाच्या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत, असे पालिकेने आवाहन केले आहे.