मलबार हिल उद्यानाजवळ पाहायला मिळणार सिंगापूरची झलक, स्थायी समितीत ट्रीवॉकचा १७ कोटी ७३ लाखांचा प्रस्ताव मंजूर

मलबार हिल येथील उद्यानाजवळ मुंबई पालिका ट्रीवॉक (Tree Walk At Malbar Hill) तयार करणार आहे. यावरून मुंबईतील (Mumbai) नागरिकांसह पर्यटकांना चालता येणार आहे.

    मुंबई : मुंबईला (Mumbai) सिंगापूर करता येत नसले तरी सिंगापूरची झलक मात्र दिली जाणार आहे, यासाठी मलबार हिल येथील उद्यानाजवळ मुंबई पालिकेकडून ट्रीवॉक (Tree Walk At Malbar Hill) तयार केला जाणार आहे. यावरून मुंबईतील नागरिकांसह पर्यटकांना चालता येणार आहे, यासाठी पालिकेकडून १७ कोटी ७३ लाख रुपयांचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मांडण्यात आला. यावेळी अनेक सदस्यांनी यावर हरकती घेतल्या. तरीही सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

    मुंबईला सिंगापूर करण्याचे स्वप्न सत्यात उतरणार नसले तरी सिंगापूरप्रमाणे ट्री वॉक करण्यात येणार आहे, मलबार हिल येथे कमला नेहरू उद्यानाजवळ हा ट्री वॉक तयार करण्यात येणार आहे. बाजूला पारदर्शक काच आणि यातून चालायला पायवाट अशी या ट्री वॉकची रचना असणार आहे. यामुळे नागरिकांना झाडांच्या मधून चालत असल्याचा अनुभव येणार आहे. दरम्यान सिंगापूर मध्येही याच पध्दतीचा ट्री वॉक आहे. तसाच हा ट्री वॉक असून ७५० मीटर लांबीचा असणार आहे.

    दरम्यान या प्रस्तावावर भाजपाचे गट नेते प्रभाकर शिंदे यांनी आक्षेप घेतला. स्थायी समितीला न सांगता काही निर्णया प्रशासन घेते याबध्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत अशा प्रस्तावाची गरज काय आहे ? असा सवाल केला. सपाचे गट नेते रईस शेख यांनी असे प्रस्ताव मंजूर करण्यापेक्षा मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याची सुधारणा अगोदर करा, अशी त्यांनी मागणी केली. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी याचे सादरीकरण करा, असे सांगत मगच हा प्रस्ताव पारित करा अशी मागणी केली. अनेकांची या प्रस्तावांस विरोध केला. तरीही हा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.

    विकासकामांना पाठिंब्याची गरज:अतिरिक्त आयुक्त
    या प्रस्तावांवरून सदस्यांनी हरकती घेतल्यानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू यांना निवेदन करण्याची सूचना अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. यावेळी वेलारासू यांनी मुंबईत विकासकामे व्हायला हवीत, त्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर २०१८ च्या खर्चाचे अंदाज पत्रक दिले होते. त्यात वाढ करण्यात आली आहे. कारण मुंबईत अशा प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच होत आहे. त्यासाठी लाकूड आणि स्टील महागडे वापरण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च वाढणार होता. मात्र त्यात वाटाघाटी केल्यानंतर ३९ टककयापर्यंत वाढीव खर्च अपेक्षित आहे. दक्षिण मुंबईतील या प्रकल्पाला कशा अडचणी भासणार आहेत. याची वस्तुस्थिती त्यांनी स्थायी समितीत सांगितली.