BMC

भरती असेल तेव्हा खारफुटीमध्ये हा कचरा अडकल्याने तेथील सजीवसृष्टीला धोका निर्माण होतो. त्यामुळे हा तरंगता कचरा अडवण्यासाठी पालिकेने तीन वर्षांपूर्वी नद्या व नाल्यांवर ट्रॅश बुम बसवले होते. यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला होता. आता पुन्हा तीन वर्षासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी तब्बल ४७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

    मुंबई – पावसाळ्यात नदी, नाले तुंबत आहेत. त्यामुळे नाल्यांतील पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरत आहे. ही दरवर्षीची डाेकेदुखी दुर करण्यासाठी मुंबईतील नदी नाल्यांमध्ये आलेला तरंगता कचरा अडवण्यासाठी नाल्यांच्या प्रवाहात ट्रॅश बुम बसवले जाणार आहेत. त्यासाठी पालिका तीन वर्षासाठी ४७ कोटी रुपये खर्च करणार आहे. नदी नाल्यांमधून प्लास्टिक, थर्माकॉल व इतर तरंगता कचरा समुद्रात जातो. त्यामुळे समुद्र दूषित होतो.

    भरती असेल तेव्हा खारफुटीमध्ये हा कचरा अडकल्याने तेथील सजीवसृष्टीला धोका निर्माण होतो. त्यामुळे हा तरंगता कचरा अडवण्यासाठी पालिकेने तीन वर्षांपूर्वी नद्या व नाल्यांवर ट्रॅश बुम बसवले होते. यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला होता. आता पुन्हा तीन वर्षासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी तब्बल ४७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

    यापूर्वी दहिसर नदी, मिठी नदी, पोईसर आणि ओशिवरा नदीसह जुहू येथील ईर्ला आणि मोगरा नाला तसेच वरळी येथील लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनजवळ हे ‘ट्रॅशबुम’ बसविण्यात आले होते. आता मिठी, वकोला, पोईसर, ओशिवरा, दहिसर नदीसह पश्चिम उपनगरातील गझदरबंध नाला, मोगरा नाला, मेन अव्हेन्यू या नदी नाल्यांमध्ये महानगरपालिका हे ट्रॅश बुम म्हणजे अडथळे लावणार आहे.

    मात्र यापूर्वी लावलेले ट्रॅश बुमचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. तरीही पुन्हा ट्रॅश बुम लावले जाणार असून दीड कोटीहून आता ४७ कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याने यावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालिका करत असलेला खर्च हा यापूर्वीच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. या आधीचा प्रयोग किती यशस्वी होता याची माहिती घेऊन टप्प्याटप्प्याने हा प्रयोग करायला हवा असे त्यांनी म्हटले आहे.

    नाले, सफाईवर काेट्यावधी रुपये खर्च करूनही दरवर्षी थोड़्य़ा पावसातही मुंबई तुंबते. त्यामुळे हा प्रयोग किती यशस्वी होईल याची खात्री आहे का असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. या प्रकल्पावरून सेना भाजपात वाद रंगण्याची शक्यता आहे.