अनिल देशमुखांनी घेतली 4 कोटींची खंडणी! वसुली रक्कम ट्रस्टकडे वळती; ईडीचा दावा

    मुंबई : माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर सीबीआयनेही फास आवलला असून त्यांची दोन मुले सलील आणि ऋषिकेशही सीबीआयच्या रडारवर आले आहेत. ईडी व्यतिरिक्त सीबीआयसुद्धा देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयां विरोधात आर्थिक व्यवहारांचा तपास करीत आहेत. देशमुख यांची मुले सलील आणि ऋषिकेशने कोलकातातील झोडियाक डेलकॉम प्रा. लि. या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.

    या दोघांनीही 2019 मध्ये ही कंपनी आणि या कंपनीच्या सहायक कंपन्यांची खरेदी केली होती. त्यात जेम्स प्रा. लि., कंक्रीट रियल एस्टेट प्रा,. लि., अटलांटिक व्हीसा प्रा. लिमिटेड आणि कंक्रीट इंटरप्राइजेज प्रा. लि.चा समावेश आहे. या चारही सहायक कंपन्यांची नोंदणी देशमुखांची मुले सलील आणि ऋषिकेश यांच्या नावावरच आहे. झोडियाक डेलकॉम कंपनीद्वारे कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आल्याचा सीबीआयला संशय आहे.

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात ईडीने मोठा दावा केला आहे. देशमुख यांना बार मालकांकडून चार कोटींची रक्कम प्राप्त झाली होती आणि ती त्यांनी बनावट कंपन्यांद्वारे देणगी स्वरुपात आपल्या ट्रस्टमध्ये वळीत केली, असा दावा ईडीने केला आहे. देशमुख यांचा पीए संजीव पलांडे आणि पी.एस. कुंदन शिंदे यांना कोर्टात हजर केल्यानंतर ईडीने हा दावा केला. हे दोघेही सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.

    वाझेमार्फत वसुली

    डिसेंबर 2020 ते 2021 च्या दरम्यान मुंबईतील पब्ज, बार आणि हॉटेलकडून बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने केली होती, असेही ईडीचे म्हणणे आहे. मुंबईतील बार, पब मालकांकडून घेतलेल्या 4.70 कोटी रुपयांपैकी 3.18 कोटी रुपये देशमुख यांनी ट्रस्टला दिले आहेत.

    हवालाद्वारे पोहोचविल्याचा दावा

    ही रक्कम देणगी स्वरुपात जमा केल्याचा देखावा केला आहे. वास्तविक ही रक्कम दिल्लीतील दोन व्यक्तींना हवालाद्वारे पोहोचली होती. त्यानंतर या दोन व्यक्तींच्या नावे बोगस कंपन्या तयार केल्या. त्यांच्या खात्यातून ही रक्कम वगळण्यात आली, असा दावा ईडीने विशेष न्यायालयात केला.

    वाझेच्या जबाबावरून कारवाई

    सचिन वाझे याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे, देशमुख यांनी तपासाबाबत काही थेट सूचना दिल्या होत्या. तसेच एका बैठकीत शहरातील बार, पब आणि ऑर्केस्ट्रा मालकांकडून महिन्याकाठी तीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितले होते. त्यासाठी वाझेने शहरातील बार मालकांची बैठक घेतली. 2021 च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दक्षिण, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील ऑर्केस्ट्रा बारकडून एक कोटी 64 लाथ तर पश्चिम उपनगरांतील बार आणि पब मालकांकडून दोन कोटी 66 लाख रुपये गोळा केले होते. तसेच डिसेंबर 2021 मध्ये काही बार मालकांनी इतरांच्यावतीने 40 लाख रुपये देशमुख यांचे स्वीय सहायक शिंदेkडे दिले होते, असा दावाही इडीने केला आहे.