ईडीचे 100 कोटी वसुली प्रकरणात आरोपपत्र; देशमुख यांनी वाझेला ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या 16 बॅग त्यांच्या पीएला देण्यास सांगितले

  मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला त्यांच्या वैयक्तिक सहाय्यक कुंदन शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आणि राजभवनाजवळ दोन स्वतंत्र प्रसंगी 4.6 कोटी रुपयांच्या 16 बॅग देण्याचे निर्देश दिले होते. याचा खुलासा अंमलबजावणी संचालनालयाने अलीकडेच विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

  दरम्यान देशमुख यांच्या सांगण्यावरून वाझे यांनी हे पैसे शहरातील बार मालकांकडून अनेक वेळा वसूल केले होते. आरोपपत्रात सचिन वाझेसह ईडीने काही शैक्षणिक संस्था चालवणारे एक ट्रस्ट आणि नवी मुंबई कंपनीचाही समावेश केला आहे. शंभर कोटींची मालमत्ता असलेली ही कंपनी फक्त देशमुख यांच्या कुटुंबातील लोकांच्या मालकीची आहे. याशिवाय ईडीने देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि पीए शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

  ईडीने अटक केल्यानंतर सचिव संजीव पलांडे आणि पीए शिंदे तुरुंगात आहेत. तपास पूर्ण केल्यानंतर पूरक आरोपपत्र दाखल केले जाईल. ईडीने न्यायालयाला सांगितले की, ते अनिल देशमुख आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात चौकशी करत आहेत. तपास पूर्ण केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करेल.

  ईडीने न्यायालयाला सांगितले की, अनिल देशमुख ईडीचे समन्स कित्येक महिन्यांपासून टाळत आहेत आणि त्यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

  वाझेला सेवेत ठेवण्यासाठी 2 कोटींची मागणी

  अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला सेवेत कायम ठेवण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते सचिन वाझेला पुन्हा सामील झाल्यामुळे संतापले होते आणि त्यांना काढून टाकण्याचा आग्रह धरत होते. नंतर देशमुख यांनी सचिन वाझेला बार मालकांकडून त्यांच्यासाठी दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. देशमुख यांनी डीसीपी राजू भुजबळ आणि एसीपी संजय पाटील यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावून अशीच मागणी केली होती.

  आरोपपत्रात नेमकं काय म्हटलंय?

  आरोपपत्रात म्हटले आहे की, जानेवारी 2021 मध्ये अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला फोन करून आजपर्यंत जमा केलेली रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले होते. देशमुख यांनी वाझेला पाच बॅगमध्ये पॅक केलेले 1.6 कोटी रुपये सह्याद्री अतिथीगृहाबाहेर त्यांचे पीए कुंदन शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले होते. हे पैसे घेण्यासाठी शिंदे देशमुख यांच्या मर्सिडीज कारमध्ये आल्याचे तपासात उघड झाले. यानंतर, फेब्रुवारीमध्ये देशमुख यांनी पुन्हा एकदा सचिन वाझेला फोन केला आणि त्यांना आतापर्यंत जमा केलेली रोख रक्कम देण्यास सांगितले. यावेळी त्यांनी राजभवन सिग्नलवर आपला पीए पाठवला आणि त्याने वाझेकडून 11 बॅग घेतल्या. त्यात सुमारे 3 कोटी रोख रक्कम होती.