आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील गोंधळांची मुख्यमंत्र्याकडून गंभीर दखल; ‘न्यासा’ च्या कारभाराबाबत मुख्यमंत्री नाराज!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आरोग्य विभागाच्या  परीक्षांच्या बेजबाबदारपणामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा अनेक मंत्र्यांनी मांडला. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यात आली.

  मुंबई: आरोग्य विभागाच्या सरळ सेवा भरती परीक्षेत ऐनवेळी गोंधळ झाल्याने या परिक्षा रद्द करत पुढे ढकलण्यात आल्या या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यानी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत ‘वर्षा’ या निवासस्थानी बोलावलेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Udhav Thackery) यांनी ‘न्यासा’ कंपनीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

  कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा
  आता नव्याने सदर परीक्षा प्रवेशपत्रक पाठवताना किमान दहा दिवस आधी परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्राची सविस्तर माहिती द्यावी, असे आदेश देत यावेळी पुन्हा कुचराई झाली तर परीक्षा घेणाऱ्या संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेबाबतच्या गोंधळाची दखल घेत बैठक बोलावली. त्यावेळी आरोग्य मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  त्रुटी राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आदेश
  ‘न्यासा’ नावाच्या कंपनीला परीक्षा घेण्याचे अधिकार दिले त्या कंपनीची विश्वासार्हता तपासून कंपनीच्या आतापर्यंतच्या अनुभवाचाही आढावा सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचे नव्याने वेळापत्रक ठरवताना कोणत्याही त्रुटी आता राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

  बेजबाबदारपणामुळे सरकारची प्रतिमा मलिन
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आरोग्य विभागाच्या  परीक्षांच्या बेजबाबदारपणामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा अनेक मंत्र्यांनी मांडला. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र परीक्षा घेण्यासाठी नेमलेली कंपनी हा आमच्या खात्याचा नव्हे, तर सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय होता, असे म्हणत टोपे विषय टोलवल्यानेही शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.