chief minister uddhav thackeray in sarpanch sanwad

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना स्वच्छता हेच अमृत आहे हे ध्यानात ठेवा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त पाणी आणि स्वच्छता यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंचांना संदेश दिला. ‘सरपंच संवाद’(Sarpanch Sanwad) कार्यक्रमात त्यांनी राज्यातील सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

  मुंबई: कोरोनाशी आपण जिद्दीने लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. तशाच पद्धतीने आपल्याला स्वच्छ महाराष्ट्र घडवायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले.देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना स्वच्छता हेच अमृत आहे हे ध्यानात ठेवा, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त पाणी आणि स्वच्छता यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंचांना संदेश दिला. ‘सरपंच संवाद’(Sarpanch Sanwad) कार्यक्रमात त्यांनी राज्यातील सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

  मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना परिस्थिती महाराष्ट्राने उत्तमरीत्या हाताळल्याबद्दल आपल्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. आम्ही दिलेल्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या त्याचेच हे फळ आहे. स्वच्छता आपल्याला पाहिजेच. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवणे गरजच आहे.

  हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या शब्दांतच अमृत आहे. स्वच्छता हेच अमृत आहे. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही, त्यामुळे आपले आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून हे अमृत
  मिळवा, असेही ते म्हणाले.

  ते पुढे म्हणाले की, कोरोना बरोबरच कचरा मुक्त आणि निरोगी गाव अशा मिशनने आपण पुढे गेले पाहिजे. अजूनही गाडगेबाबांनी जो संदेश दिला आहे तो कालबाह्य झालेला नाही. त्यांनी आपल्याला काळाच्या पुढे पाहायला शिकवले. ते तेव्हा एकटे होते पण आज आपण सगळे आहात. प्रत्येक सरपंच जर गाडगेबाबा बनले तर गावांचे चित्र बदलेल. अनेक साधू, संतांची परंपरा आपल्याला लाभली आहे. त्याच भूमीत आपण सुद्धा जन्माला आलो आहोत. आपल्याला ती शिकवण घेऊन पुढे जायचे आहे. लोकांकडून त्या शिकवणीप्रमाणे करून घ्यायचे आहे. भावी पिढीने सरपंचाची आठवण काढली पाहिजे इतके चांगले काम आपण करून दाखवा.

  एक विश्वासाने लोक आपल्याला निवडून देतात. गावांत रोजगार निर्माण व्हावा, छोटे मोठे व्यवसाय सुरू व्हावेत, एक आदर्श गाव निर्माण व्हावे. सरपंच हे एखाद्या झाडाच्या मुळांसारखे असतात. पर्यावरण बदलते आहे असे आपण म्हणतो पण याला आपणच कारणीभूत आहोत. गावागावातली कामे करताना पर्यावरणाचा विचार करून झाली पाहिजेत. स्वतः स्वतःची जबाबदारी घ्या, असेही त्यांनी सांगितले.

  मुख्यमंत्री पुढे म्हणाले, घर घर मे नल ही योजना सरपंचांनी राबवून ती यशस्वी करणे गरजेचे आहे. विकासाची किरणे खालपर्यंत पोहचली नसतील तर काय उपयोग? आपण सर्व या व्यवस्थेचा पाठकणा आहेत. तुमच्या सूचना , सहभाग हा या योजनेचे यश ठरविणार आहे. अजूनही पावसाळा संपलेला नाही. परिस्थिती विचित्र झाली आहे. आपण आपत्तींना समर्थपणे तोंड देतो आहोतच. आपण अजिबात डगमगू नका. यावर मात करण्याची ताकद आपल्यात आहे, खचून जाऊ नका.

  जगामध्ये महाराष्ट्राचा लौकिक पसरला पाहिजे. शिवरायांनी दाखवलेली जिद्द दाखवा. संकटाना तोंड देण्याची हिम्मत आपल्यात आहे. डोळे दिपवून टाकणारा स्वच्छ महाराष्ट्र निर्माण करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.