नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

जे अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतंच नसतं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल तर वार कसा करणार?, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष सत्तेत असताना काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या निवडणुकीमध्ये आपण स्वतंत्र लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

    काय म्हणाले नेमकं उद्धव ठाकरे ?

    जे अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतंच नसतं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल तर वार कसा करणार?, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावर आमच्या हिंदुत्वावर, विचारांवर संशय घेतला जातो. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का?, असं विचारलं जातं. मला या लोकांना सांगायचं आहे की, हिंदुत्व हे काही नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, हिंदुत्व आमचा श्वास असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

    दरम्यान, मी 55 वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझं अभिवादन, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना अभिवादन केलं.