लेटरबॉम्ब आणि बदल्या रॅकेटप्रकरणी मुख्य सचिवांची गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत खलबते! लवकरच कारवाईचे आदेश?

रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी काल केला होता. यामध्ये अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले असा दावाही त्यांनी केला.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या फोन टँपिंग प्रकरणाबाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून चर्चा केल्या आहेत. बैठकीला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.  बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल तयार करण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    सूत्रांच्या माहितीनुसार फोन टॅपिंग झाले तेव्हा कुंटे हेच गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते. आपल्याकडून या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचे कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी ज्या क्रमांकाबाबतची घेतली मात्र दुसरेच नंबर टॅप केल्याचेही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. प्रकरणात आता सविस्तर अहवाल तयार केला जात असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.

    परवानगी शिवाय फोन टॅपिंग

    रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी काल केला होता. यामध्ये अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले असा दावाही त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, ‘कोणालाही फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त मुख्य गृह सचिवांची रितसर परवानगी लागते, रश्मी शुक्लांनी अमुक एका क्रमांकासाठी परवानगी घेतली होती का, या प्रश्नाचे उत्तर कुंटे यांनी नकारात्मक स्वरुपात दिले. पोलीस बदली रॅकेट प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी परवानगी शिवाय फोन टॅपिंग केलेच कसा असा सवाल केला आहे. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली आहे. ‘रश्मी शुक्ला या पोलीस अधिकारी आहेत म्हणून कोणत्याही नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकतात’, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. फोन टॅपिंग करताना  नियम व कायदे आहेत, या प्रकरणात असे दिसते की अधिकार्‍यांनी मनमानी करुन फोन टॅपिंगला लावले होते? असा गंभीर आरोप मंत्री आव्हाड यांनी केला आहे