‘सफाई कर्मचाऱ्यांच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी’

'सन १९९३ नुसार हाताने मैला साफ करताना दुषीत गटारामध्ये मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना रूपये दहा लाखची नुकसान भरपाई देण्यात येते. ज्या कार्यक्षेत्रात अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत त्या संबधित यंत्रणांनी तात्काळ कार्यवाही करावी.' राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या राज्य सरकारला सुचना.

    मुंबई : सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, तसेच रिक्त पदे तातडीने भरावीत अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी. पी. वावा यांनी  केल्या आहेत. सफाई कामगारांच्या सामाजिक, आर्थिक समस्या जाणून घेण्यासंदर्भात तसेच शासन अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी. पी. वावा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. सागर चरण, अखिल भारतीय सफाई मजदूर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदभाई परमार  उपस्थित होते.

    ३२ सफाई कामगारांपैकी ११ मृतांच्या कुटुंबाना नुकसान भरपाई

    डॉ. पी. पी. वावा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन क्र ५८३/२००३ मध्ये दिनांक २७ मार्च २०१४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सन १९९३ नुसार हाताने मैला साफ करताना दुषीत गटारामध्ये मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना रूपये दहा लाखची नुकसान भरपाई देण्यात येते. ज्या कार्यक्षेत्रात अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत त्या संबधित यंत्रणांनी तात्काळ कार्यवाही करावी.  कोणत्याही प्रकारचे विलंब न करता ही नुकसान भरपाई संबधित कुटूंबाना देण्यात प्राधान्य देण्यात यावी. राज्यात गटारामध्ये मृत्यू पावलेल्या हाताने मैला साफ करणा-या ३२ सफाई कामगारांपैकी ११ मृत सफाई कामगारांच्या कुटुंबाना नुकसान भरपाई मिळाली असून उर्वरीत प्रकरणातही संबधित यंत्रणांनी गतीमान कार्यवाही करावी.

    मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करा

    सफाई कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेते समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही करावी.सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल योजनेतून पक्की घरे देण्यात यावीत.शासन सेवेतील सफाई कामगारांच्या आस्थापन विषयक प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावेत. सफाई कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेवून मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी, असे निर्देश डॉ.पी.पी.वावा यांनी दिले.