केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा; खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच करून ठेवली असल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांमुळे राज्यात मनोरंजनासाठी सिनेमा-नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

  मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक सदरामध्ये पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आजच्या रोखठोकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

  विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच करून ठेवली असल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांमुळे राज्यात मनोरंजनासाठी सिनेमा-नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

  काय आहे आजच्या सामनात?

  महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात आणि त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असं मला वाटतं,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. कोरोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चं मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असं वाटतं. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असं मनोरंजन सुरू आहे, असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे.

  दरम्यान चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गमतीचेच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?, असा मिश्किल सवालही त्यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार?,’ असंही राऊतांनी लेखात म्हटलं आहे.

  सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा

  लेखात संजय राऊतांनी लिहिलं की, राजकारण्यांकडून विविध पातळ्यांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे. किरीट सोमय्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात. महाराष्ट्राला आणि देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते.

  नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावरही टीका

  ज्यांनी कोव्हिशिल्डचे डोस घेतले, त्यांनाच आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी आहे. अनेक विद्यार्थी, उद्योजक मंडळींचे वांदे झाले अनेकांना युरोप-अमेरिकेच्या विमानतळावरूनच त्यांच्या देशात प्रवेश करू दिला नाही. आपल्या पंतप्रधानांनी कोवॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. तरी ते खास विमानाने अमेरिकेत पोहोचले. नियम फक्त सामान्यांना, मोठ्यांना नाही का असं विचारलं तर भाजपाचे लोक म्हणतील छे छे, मोदी है तो मुमकिन है! मोदींना कोण अडवणार? हेसुद्धा एक मनोरंजन आहे” असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर सुद्धा टोला लगावला आहे.