काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटेंच्या नावावर शिक्कामोर्तब ? पावसाळी अधिवेशनात होणार निवड

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या भोर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्रीविजय वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत होते.

  मुंबई : राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदावरून नाना पटोले(Nana Patole) यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या भोर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्रीविजय वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत होते. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानी विद्यमान मंत्रिमंडळात बदल न करता बाहेरील नेत्याला जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.

  थोपटे यांची निवड निश्चित
  मागील अधिवेशनात अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून नाव अंतिम होवू शकले नाही त्यामुळे ही निवड लांबली होती. आता पावसाळी अधिवेशनात राजभवानातून या निवडीबाबत तगादा लावण्यात आला आहे. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर या पदाला जास्तकाळ रिक्त ठेवणे योग्य होणार नाही अशी भूमिका आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली होती.  त्यानंतर पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची या पदासाठी निवड निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

  नवीन कृषी कायदा याच अधिवेशनात
  थोरात म्हणाले की, केंद्राच्या कृषी कायद्यांनी शेतकर्‍यांना फटका बसणार आहे. त्यामुळे नवीन कृषी कायदा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या अधिवेशनात तो कायदा येईलच, त्यासाठी आम्ही सर्व घटकांशी बोलत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा असेल, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

  दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.