काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष!; बाळासाहेब थोरात

विदर्भातील जनतेने पदवीधर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडूण देऊन काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवलेला आहे. ते चित्र पाहता विदर्भातील जनता अजूनही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी असल्याचे दिसून येते.

  • विदर्भ पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करु- विजय वडेट्टीवार
  • चंद्रपुरचे संदीप वामनराव गड्डमवार कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये

मुंबई. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा ओघ सतत वाढत असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदीप वामनराव गड्डमवार तसेच जिल्हा बँकेचे संचालक, माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेमध्ये प्रवेश केला. संदीप यांचे वडील वामनराव गड्डमवार हे काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी राज्य मंत्री तसेच चंद्रपुर-गडचिरोली जिल्हा परीषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पक्ष प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस अधिक मजबूत होईल.

काँग्रेसचा विचार हाच देशहिताचा विचार आहे. राज्यात व देशात काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो लोकांच्या हितासाठी सतत संघर्ष करत आला आहे. संविधानाला कुठेही बाधा येऊ न देता काँग्रेस पक्ष कार्य करत आला आहे. काँग्रेस हा सर्वसामान्यांना ताकद देऊन त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

गांधी भवन येथे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन,  सरचिटणीस व मा. आ. मोहन जोशी, माजी आमदार मधू चव्हाण, प्रदेश सचिव संतोष केणे, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की,विदर्भातील जनतेने पदवीधर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडूण देऊन काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवलेला आहे. ते चित्र पाहता विदर्भातील जनता अजूनही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. विदर्भातील संदीप वामनराव गड्डमवार व रविंद्र शिंदे यांचे थोरात यांनी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून येथील जनता सदैव काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. जे लोक दुसऱ्या पक्षात गेले होते ते पुन्हा काँग्रेसमध्ये येत असून विदर्भ पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला करुन काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणू असा विश्वास व्यक्त केला.