राज्यसभा बिनविरोध करण्याची काँग्रेस नेत्यांची फडणवीस यांना विनंती; भाजपकडून १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव?

राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपची मनधरणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या या वर्तनामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाराजीचा सूर असल्याचे सांगण्यात येत आहे.

  मुंबई : राज्यसभेचे दिवंगत काँग्रेस सदस्य राजीव सातव यांच्या रिक्त जागे करीता कालच भाजपचे संजीव उपाध्याय आणि काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी येत्या चार तारखेला मतदान होणार आहे मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणुक बिनविरोध करण्याबाबत विनंती केली आहे. काँग्रेस नेत्यांनी भाजपची मनधरणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या बदल्यात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

  कोअर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेऊ

  थोरात म्हणाले की, राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे जागा रिक्त होते तेव्हा महाराष्ट्राची परंपरा आहे की ती निवडणूक बिनविरोध करायची. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपण कोअर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे सांगितल्याचे थोरात म्हणाले. दुसरी कुठलीही चर्चा यावेळी झाली नाही, असा खुलासाही थोरात यांनी केला आहे.

  प्रघात कायम राहावा म्हणून फडणवीसांची भेट

  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसने भाजपसमोर लोटांगण घातल्याच्या चर्चा सुरु असल्याचे विचारले असता थोरात म्हणाले की हे लोटांगण नाही किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही नाराज नाही. याबाबत सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर आम्हाला निवडणूक जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. मात्र, महाराष्ट्राची परंपरा, जो प्रघात आहे तो कायम राहावा म्हणून फडणवीसांची भेट घेतली. ती दोघांचीही जबाबदारी आहे, असे थोरात म्हणाले.

  राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाराजीचा सूर

  दरम्यान राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपची मनधरणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या या वर्तनामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाराजीचा सूर असल्याचे सांगण्यात येत आहे.