आज खडसेंचा नंबर लागला उद्या माझा लागेल; काँग्रेसचा ‘हा’ मंत्री म्हणाला…

ईडीची नोटीस मिळाली असल्याचा खुलासा स्वतः एकनाथ खडसे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते.

मुंबई. भाजपाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांना ईडीने ३० डिसेंबरला हजर राहण्याची नोटीस पाठविल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्याच महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठविली होती. यानंतर त्यांच्या घरीदेखील छापे मारले होते. यामुळे आधीच केंद्र विरोधात राज्य सरकार असा संघर्ष चालला असताना शुक्रवारी रात्री खडसेंना ईडीने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा भाजपा विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे.

ईडीची नोटीस मिळाली असल्याचा खुलासा स्वतः एकनाथ खडसे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे किंवा कोणते अन्य प्रकरण आहे, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

आता काँग्रेसचे आमदार आणि ठाकरे सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. आज खडसे, तर उद्या माझाही नंबर लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाला हा धंदा खूप महागात जाईल असा इशाराही वड्डेटीवार यांनी दिला आहे.