congress Farmers Bill

राज्यात २०२१ मध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर या पाच मोठ्या व महत्वाच्या महानगरपालिका निवडणुकी होत आहेत. तर दोन जिल्हा परिषदा, १३ नगर परिषदा व ८३ नगर पंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १३ सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केलेली आहे.

मुंबई :  राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. तीन पक्षाचे हे सरकार कोरोना संकटावर मात करत आता स्थिरस्थावर झाले आहे.  आगामी वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे.

सरकारची वर्षभरातील दमदार वाटचाल व पदवीधर, शिक्षक निवडणुकीत मिळालेला दणदणीत विजयामुळे पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. काँग्रेसने आतापासून नियोजन, रणनिती आखून निवडणुकीच्या कामाला सुरुवात केलेली आहे.

राज्यात २०२१ मध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर या पाच मोठ्या व महत्वाच्या महानगरपालिका निवडणुकी होत आहेत. तर दोन जिल्हा परिषदा, १३ नगर परिषदा व ८३ नगर पंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १३ सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केलेली आहे.

या सर्व निवडणुकांसाठी पक्ष निरीक्षकांच्या नेमणुकाही करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय काँग्रेसच्या १२ मंत्र्यांकडेही संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी आहे. आतापासूनच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीत कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे याचे मार्गदर्शनही केले जात आहे.

राज्य सरकारने एक वर्षांच्या कालावधीतच शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीनंतर १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज, चक्रीवादळानंतरही आर्थिक मदत, मच्छीमारांसाठी  पॅकेज दिलेले आहे. कोरोनासारख्या मोठ्या संकटालाही मोठ्या शिताफीने तोंड दिलेले आहे. कोरोना काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात घरोघरी अन्नधान्याची मदत, औषधांची मदत केली, युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबीरे आयोजित केली. गरिब, कामगार, मजूर यांना मदतीचा हाथ दिला.

नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांमध्ये नागपूरसारखा भाजपा-आरएसएसचा ५० वर्षांचा बालेकिल्ला काँग्रेसने खेचून आणला तर पुण्यातही भाजपाचा सपाटून पराभव केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील उत्साह व चैतन्य आणखी वाढले आहे.

राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार असले तरी काँग्रेसने कंबर कसली असून काँग्रेसचे सर्व नेते मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत. काँग्रेसला आणखी उभारी देण्यासाठी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधत सर्व तयारी सुरु केलेली आहे. राज्यात सत्ता आहेच, त्यात तीन पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे फारसे अवघड नाही हा आत्मविश्वासही कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागल्याने भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.