
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राहिलेल्या शरद रणपिसे (Sharad Ranpise) यांच्या निधनामुळे विधानपरिषदेत काँग्रेसमध्ये मागासवर्गीयांचे सक्षमपणे प्रतिनिधीत्व करणाऱ्या काँग्रेसमनची उणिव भासत आहे. ही उणिव दूर करण्यासाठी पक्षाने योग्य उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.
मुंबई : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राहिलेल्या शरद रणपिसे (Sharad Ranpise) यांच्या निधनामुळे विधानपरिषदेत (Legislative Council) काँग्रेसमध्ये मागासवर्गीयांचे सक्षमपणे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसमनची उणिव भासत आहे. ही उणिव दूर करण्यासाठी पक्षाने योग्य उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पक्षाच्या टिळकभवन कार्यालयात इच्छुकांची गर्दी आहे. मात्र, केवळ अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी मोठ्या नेत्यांऐवजी प्रभावीपणे पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी २९ नोव्हेंबरला एका जागेसाठी पोटनिवडणूक अपेक्षित आहे.
१६ नोव्हेंबर या अर्ज भरण्याची अंतिम दिवसापूर्वी इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने उमेदवारांचे नाव जाहीर होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाचे संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
अनेक दिग्गजांची नावे इच्छुकांच्या यादीत
जुन्या पिढीतील शरद रणपिसे यांच्या रुपाने काँग्रेस पक्षाला अनुसूचित जातीचे विधानपरिषदेत मिळाले होते. त्यामुळे ही जागा याच समाजाला देण्यात यावी, जेणेकरून समाजाला वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधीत्व मिळेल, असे सांगत अनेक इच्छुक सरसावले आहेत. त्यात माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नुकतेच सरचिटणीस जितेंद्र देहाडे याची नावे शर्यतीत आहेत. विधानपरिषदेत रणपिसे काँग्रेसचे गटनेते होते. त्यांच्या निधनानंतर परिषदेत अनुसूचित जातींचा एकही आमदार नाही. त्यामुळे ही जागा मागास समाजालाच मिळावी, असा आग्रह दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे केला जात आहे.
डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा विचार
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा विचार विधानपरिषदेसाठी होवू शकतो. कारण सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा असताना ही जागा आधीच्या राजकीय अपरिहार्यता पाहता रजनी पाटील यांना देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीनी घेतला होता. त्यामुळे विधानपरिषदेच्या माध्यमातून सातव कुटुंबियाना दिलेले शब्द पूर्ण केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीतही संधी
अन्य सूत्रांच्या माहितीनुसार, रजनी पाटील यांचे नाव पूर्वी ज्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीतही होते. तेथे सातव कुटुंबियांना सामावून घेतले जाणार असल्याने पुण्यातील मागासवर्गीय समाजाच्या उमेदवाराचा या जागेसाठी विचार केला जावू शकतो. पुण्यातूनच माजी आमदार मोहन जोशी, अनंत गाडगीळ ही नावेदेखील इच्छुकांच्या यादीत असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या सदस्याला रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्ष म्हणजे २७ जुलै २०२४ पर्यंत काम करण्याची संधी मिळणार आहे.