संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे निर्बंध येणार? वाढता कोरोना आणि ओमायक्रॉनच्या धरतीवर निर्णय

संसदेचे ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेचे ७०० हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. माहितीनुसार ४ जानेवारीपर्यंत संसद परिसरातील ७१८ कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ज्यामध्ये २०४ कर्मचारी एकट्या राज्यसभा सचिवालयातील होते.

    नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशात कोरोना आणि ओमायक्रॉन या विषाणूने थैमान मांडले आहे, देशात दिवसागणिक हजारोंच्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान,  संसदेचे ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेचे ७०० हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. माहितीनुसार ४ जानेवारीपर्यंत संसद परिसरातील ७१८ कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ज्यामध्ये २०४ कर्मचारी एकट्या राज्यसभा सचिवालयातील होते. यादरम्यान तज्ज्ञांनी म्हटले आहे की, जेव्हापासून संसद सुरू होईल, तेव्हा कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचली असेल. अशात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असेल. त्यामुळं या अधिवेशनावर कोरोनाचे सावट असून काही निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे.

    दरम्यान, देशात सध्या कोरोनासह ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटादरम्यान होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची परिस्थिती पावसाळी अधिवेशन २०२० प्रमाणे होऊ शकते. सप्टेंबर २०२०मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनात कठोर कोरोना नियम लागू केले होते. दिवसाच्या पहिल्या भागात राज्यसभा बैठक आणि दुसऱ्या भागात लोकसभा बैठक आयोजित केली जात होती. त्यानुसार पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन पूर्वनियोजित वेळेनुसार पार पडले. पण याकाळात सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळण्यात आले. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कठोर कोरोना नियम पुन्हा लागू होऊ शकतात. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

    फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात १ फेब्रुवारीला केंद्र सरकार संसदेत बजेट सादर करणार आहे. दोन टप्प्यात सभागृहाचे कामकाज होणार आहे. ११ फेब्रुवारीला अधिवेशनाचा पहिला टप्पा होणार आहे. तर दुसरा टप्पा १२ मार्चपासून सुरू होणार आहे. संसदेचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ एप्रिलपर्यंत चालणार असून काही दिवस विश्रांतीसुद्धा देण्यात आली आहे. हे जरी नियोजित असले तरी, सध्या कोरोनाचे आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या पाहता यात काही बदल होतील अशी सुद्धा भीती व्यक्त करण्यात येत आहे.