Corona Updates : रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाकडून खबरदारीचे उपाय, उपनगरीय रेल्वे, बेस्टच्या प्रवासी संख्या घटली; ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा परिणाम

मुंबई महानगरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाकडून खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनालाही तसे आदेश दिले आहेत. १५ मार्चला जारी करण्यात आलेल्या आदेशात सरकारी व खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती, घरातूनच काम करावे, असे नमूद करण्यात आले आहे. त्याला काही अंशी प्रतिसाद मिळाला आहे.

    मुंबई : कोरोनाची धास्ती व ५० टक्के कर्मचारी उपस्थितीमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे व बेस्टची प्रवासी संख्या काहीशी कमी झाली आहे. मध्य रेल्वेची प्रवासी संख्या साधारण दोन लाखांनी, तर पश्चिम रेल्वेची ९५ हजार, तर बेस्टची सुमारे ९० हजारांनी कमी झाली आहे.

    मुंबई महानगरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाकडून खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनालाही तसे आदेश दिले आहेत. १५ मार्चला जारी करण्यात आलेल्या आदेशात सरकारी व खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती, घरातूनच काम करावे, असे नमूद करण्यात आले आहे. त्याला काही अंशी प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारी २०२१ मध्ये मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज सरासरी १३ लाख प्रवासी प्रवास करीत होते. फेब्रुवारीत हीच संख्या २० लाखांपर्यंत, तर १५ मार्चच्या आधी २१ लाखांपर्यंत होती. ५० टक्के उपस्थितीनंतर ही संख्या काहीशी कमी झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. आता प्रवासी संख्या १९ लाख इतकी आहे.

    पश्चिम रेल्वेवरही १४ मार्चला १७ लाख ८३ हजार ६२३ असलेली प्रवासी संख्या २२ मार्चला १६ लाख ८९ हजार २९९ पर्यंत पोहोचली. या आकडेवारीवरून प्रवाशांच्या संख्येत ९४ हजार ३२४ने घट झाली आहे. रेल्वेपाठोपाठ बेस्ट उपक्रमातील प्रवासी संख्याही काहीशी रोडावली आहे. १५ मार्चला २५ लाख १४ हजार ८८० असलेली प्रवासी संख्या २४ लाख २४ हजार झाली असून ९० हजार प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवली आहे.

    सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य प्रवाशांना ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. पंरतु या वेळेआधीच किंवा नंतरही अनेक जण प्रवास करतात. परिणामी प्रवासी संख्या वाढत गेली आहे. शिवाय ५० टक्के कर्मचारी उपस्थिती केली, तरीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद अद्यापही मिळालेला नसल्याचे राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.