कोरोनाचा कहर, लॉकडाऊन बाबत मुंबई पालिकाच संभ्रमात; चाचण्या आणि लसीकरणावरच जोर, एवढं करूनही विळखा सैल होण्याऐवजी घट्ट होतोय

४५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी लसीकरणाची मोहीम जोरदारपणे राबविण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या रोज ४५ हजारांचे लसीकरण होते. ती संख्या वाढविण्याची गरज आहे.

    मुंबई : कोरोनाचा कहर वाढत असताना पालिका प्रशासन लॉकडाऊन करावा की करू नये याबाबत अजूनही संभ्रमात आहे. मात्र लॉकडाऊन करायचे झाल्यास एकदम नव्हे, तर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करण्याचे पालिकेचे धोरण आहे.

    सध्या ९० टक्के रुग्ण उच्चभ्रू वस्तीतून येत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. मुंबईत अजूनपर्यंत ४० हजार चाचण्या झाल्या असून त्या पन्नास हजारांहून अधिक करण्याची तयारी करण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी लसीकरणाची मोहीम जोरदारपणे राबविण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या रोज ४५ हजारांचे लसीकरण होते. ती संख्या वाढविण्याची गरज आहे. मुंबईत ४५ वर्षांवरील सुमारे ४० लाख नागरिक असावेत.

    त्यांच्यासाठी १४ केंद्रांत दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. साठ वर्षांवरील सुमारे ८ लाख ज्येष्ठ नागरिक असून त्यांचे लसीकरण मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याची पालिकेची तयारी चालली आहे. एकूण ३१ मे पर्यंत सर्वांचेच लसीकरण होईल, अशी तयारी पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एप्रिल-मे महिन्यात ज्या पद्धतीने कोरोना केअर सेंटरमध्ये तयारी ठेवण्यात आली होत, त्याच पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. सध्या १४ हजार बेडची तयारी आहे. त्या आठवडाभरात २४ हजार करण्यात येणार आहेत.

    रुग्णसंख्या वाढत असली तरी प्रशासनात लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. मात्र चाचण्या वाढविणे, कोरोना केअर सेंटरमध्ये सुविधा देणे आणि लसीकरण करणे यावरच सध्या तरी भर देण्यात आला आहे. सद्यस्थितीत अँटिजेन चाचणी ४० टक्के तर आरटीपीसीआर चाचण्या ६० टक्के करण्यात येत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता कोरोना केअर सेंटरमधीर रिकाम्या दिसणाऱ्या खाटा आता ४० टक्केच रिकाम्या आहेत.

    आठवडाअखेर लॉकडाऊन?

    वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका आरोग्य खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वीकेण्डला लॉकडाऊन असावे असे मत व्यक्त केले. गर्दीमुळे कोरोना फोफावला असताना शनिवार-रविवारी किंवा सुट्ट्या जोडून आल्यास लोक फिरायला किंवा पिकनिकला जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आठवडा अखेरीस किंवा सार्वजनिक सुट्ट्यांदिवशी लॉकडाऊन असावा, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.