मुलींनी व्यक्त केली वडिलांसोबत भारतात राहण्याची इच्छा, आईने पाल्यांचा ताबा मिळवण्यासाठी चढली कोर्टाची पायरी – न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

अमेरिकेत(america) राहत असलेल्या घटस्फोटित महिलेचे पती ऑगस्ट २०१९ मध्ये आपल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना घेऊन भारतात आले. तेव्हापासून आपल्या दोन्ही मुली आपल्याला भेटलेल्या नाहीत. अमेरिकेतील न्यायालयाने दोन्ही मुलींचा ताबा आपल्याला दिलेला आहे. तसे असतानाही पतीने मुलींना स्वतःकडे ठेऊन न्यायालयीन निर्णयाचा अवमान केला आहे. त्यामुळे आपल्या मुलींचा ताबा(custody of children) आपल्याला परत देण्यात यावा, म्हणून महिलेने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

    मुंबई :अल्पवयीन मुलींचा ताबा आपल्याला परत मिळावा म्हणून उच्च न्यायालयाची(high court) पायरी चढलेल्या महिलेला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. दोन्ही मुलींना त्यांच्या इच्छेनुसार भारतात त्यांच्या वडिलांसोबत राहायचे आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.

    अमेरिकेत राहत असलेल्या घटस्फोटित महिलेचे पती ऑगस्ट २०१९ मध्ये आपल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना घेऊन भारतात आले. तेव्हापासून आपल्या दोन्ही मुली आपल्याला भेटलेल्या नाहीत. अमेरिकेतील न्यायालयाने दोन्ही मुलींचा ताबा आपल्याला दिलेला आहे. तसे असतानाही पतीने मुलींना स्वतःकडे ठेऊन न्यायालयीन निर्णयाचा अवमान केला आहे. त्यामुळे आपल्या मुलींचा ताबा आपल्याला परत देण्यात यावा, म्हणून महिलेने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

    या याचिकेवर नुकतीच न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, आपल्या दोन्ही अल्पवयीन मुलींचा ताबा पतीकडे दिल्यास त्यांच्या हिताचे ठरणार नाही. असा युक्तिवाद आईच्या वतीने करण्यात आला.

    मात्र, दोन्ही मुली या अनुक्रमे १८ आणि १५ वयाच्या आहेत. पहिली मुलगी सज्ञान असून दुसरी सज्ञान होण्याच्या मार्गावर आहे. जरी मुलींची इच्छा या प्रकरणात निर्णायक घटक नसली तरीही दोन्ही मुलींच्या भारतात आपल्या वडिलांकडे राहण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण, मुलं सज्ञान झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या मर्जीने स्वतंत्र राहण्याचा तसेच निर्णय घेण्याचा घटनात्मक अधिकार प्राप्त होतो असे निरीक्षण खंडपीठाने यावेळी नोंदवले. तसेच अमेरिकेत आपल्या जीवनाचा बराचसा काळ व्यतीत केला असून आता वडिलांसोबत कायम राहण्याची इच्छा मुलींनी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. याशिवाय दोन्ही मुली भारतात शिकत असून त्यांच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीही उत्तम असल्याचे अधोरेखित करत खंडपीठाने मुलींच्या आईला दिलासा देण्यास नकार दिला.