मुंबईतील ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये आढळली कोविड अँटीबॉडीज; पालिकेच्या पाचवा सेरो सर्वेक्षणातील निष्‍कर्ष

कोविड लसीकरण झालेल्‍या नागरिकांपैकी अँटीबॉडीज विकसित झालेल्‍यांची संख्‍या ९०.२६ टक्के तर लसीकरण न झालेल्‍यांपैकी ७९.८६ टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटीबॉडीज आढळली आहेत. विशेष म्‍हणजे, मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये देखील अँटीबॉडीज विकसित होण्‍याचे प्रमाण वाढल्‍याचा निष्‍कर्षही यातून समोर आला आहे.

    मुंबई (Mumbai) : मुंबईतील ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये कोविड अँटीबॉडीज (Covid antibodies) आढळली आहेत. यात लसीकरण झालेल्यांपैकी ९०.२६ टक्के व लसीकरण न झालेल्यांमध्ये ७९.८६ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहे. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) केलेल्या पाचव्या सेरो सर्वेक्षणाच्या (fifth sero survey report) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

    मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये देखील अँटीबॉडीज विकसित होण्‍याचे प्रमाण वाढल्‍याचा निष्‍कर्षही यातून समोर आला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागातील किती नागरिकांमध्ये अँटी-बॉडीज विकसित झाल्या हे समजण्यासाठी महापालिकेकडून सेरो सर्वेक्षण केले जाते. आतापर्यंत केलेला हा पाचवा सेरो सर्वेक्षण असून त्याचा अहवाल पालिकेने सादर केला आहे. पालिका आता दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सेरो सर्व्हे करण्यात आला आहे.

    रक्‍त नमुन्‍यांची चाचणी करुन अँटीबॉडीज (अॅण्‍टीबॉडीज्) शोधण्‍याबाबतचे सर्वेक्षण पालिकेकडून करण्‍यात आले. यात एकूण ८६.६४ टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटीबॉडीजचे अस्‍त‍ित्‍व दिसून आले आहे. कोविड लसीकरण झालेल्‍या नागरिकांपैकी अँटीबॉडीज विकसित झालेल्‍यांची संख्‍या ९०.२६ टक्के तर लसीकरण न झालेल्‍यांपैकी ७९.८६ टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटीबॉडीज आढळली आहेत. विशेष म्‍हणजे, मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये देखील अँटीबॉडीज विकसित होण्‍याचे प्रमाण वाढल्‍याचा निष्‍कर्षही यातून समोर आला आहे.

    अँटीबॉडीज आढळले तरी ते किती प्रमाणात सुरक्षितता आहे याची वैद्यकीय हमी देता येत नाही. त्‍यामुळे नागरिकांनी या दुर्लक्ष, ढिलाई न करता, कोविड विषाणू संसर्ग होवू नये म्‍हणून मास्‍कचा उपयोग, हातांची नियमित स्‍वच्‍छता, सुरक्षित अंतर आदी कोविड नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे, असे या अहवालात स्पष्ट केले आहे.

    या पूर्वीच्या चार सर्वेक्षणानंतर, कोविडच्‍या संभाव्‍य तिस-या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर, पुन्‍हा एकदा रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्‍यानुसार, १२ ऑगस्‍ट ते ८ सप्‍टेंबर २०२१ या कालावधीमध्‍ये महानगरपालिकेने पाचवे सेरो सर्वेक्षण करून त्याचा निष्‍कर्ष आता जाहीर करण्‍यात आला आहे.

    पालिकेचा सार्वजनिक आरोग्‍य विभाग, शीव येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालय यांच्‍या वतीने आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्‍स्‍ट‍िट्यूट यांच्‍या संयुक्‍त सहकार्याने हे पाचवे सेरो सर्वेक्षण राबविण्‍यात आले. शास्‍त्रोक्‍तरित्‍या यादृच्‍छ‍िक नमुना निवड पद्धतीचा वापर करून, वय वर्ष १८ पेक्षा अध‍िक असलेल्‍या नागरिकांमध्‍ये हे सेरो सर्वेक्षण केले आहे.

    महानगरपालिकेचे दवाखाने तसेच खासगी वैद्यकीय व्‍यावसायिक यांच्‍याकडे येणाऱया विविध समाज घटकातील रुग्‍णांचा यामध्‍ये समावेश होता. पालिका क्षेत्रातील सर्व २४ प्रशासकीय विभागात मिळून एकूण ८ हजार ६७४ नागरिकांचे रक्‍त नमुने संकलित करुन त्‍याची चाचणी करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्‍या नागरिकांची माहिती नोंदविण्‍यासाठी मोबाईल अॅप्‍लीकेशनचा उपयोग करण्‍यात आला तसेच सर्वेक्षणामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी त्‍यांची संमती देखील घेण्‍यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

    सेरो सर्वेक्षणातील निष्‍कर्ष :
    १) या सर्वेक्षणात केलेल्‍या चाचण्‍यांपैकी एकूण ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये संबंधित सकारात्मक अँटीबॉडीज आढळली आहेत. यामध्‍ये झोपडपट्टी परिसरांमध्‍ये सुमारे ८७.०२ टक्‍के तर बिगर झोपडपट्टी भागांमध्‍ये सुमारे ८६.२२ टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटीबॉडीज आहेत.

    २) पुरुषांमध्ये ८५.०७ टक्के इतकी तर महिलांमध्ये ८८.२९ टक्के इतकी अँटीबॉडीज

    ३) सर्वेक्षण केलेल्‍या नागरिकांपैकी सुमारे ६५ टक्‍के नागरिकांनी कोविड लस घेतली असून उर्वरित ३५ टक्‍के नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

    ४) लस घेतलेल्‍या नागरिकांमध्ये सुमारे ९०.२६ टक्‍के अँटीबॉडीज विकसि‍त झालेली आहेत.

    ५) ज्‍यांनी कोविड लस घेतलेली नाही अशा नागरिकांपैकी सुमारे ७९.८६ टक्‍के नागरिकांमध्‍येही अँटीबॉडीज विकसित झाली आहेत.

    ६) सर्वेक्षणात घेतलेल्‍या नमुन्‍यांपैकी सुमारे २० टक्‍के हे आरोग्‍य कर्मचाऱयांचे होते. या गटामध्‍ये अँटीबॉडीज असण्‍याचे प्रमाण हे ८७.१४ टक्के इतके आहे.

    ७) विविध वयोगटांमध्ये ८० ते ९१ टक्‍के दरम्‍यान अँटीबॉडीज अस्‍त‍ित्‍व असल्याचे आढळून आले आहे.

    कोविड लसीकरणावर भर
    कोविड लस घेतलेल्‍या नागरिकांमध्‍ये अँटीबॉडीज आढळण्‍याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कोविड लसीकरण मोहीम अधिक बळकट करण्‍याची शिफारस ही सर्वेक्षणाच्‍या अभ्‍यासगटाने केली आहे.