Corona Side Effects : कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय; दादरचे भाजी-फूल मार्केट बीकेसी, सोमय्या मैदानावर हलवणार

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. दैनंदिन रुग्णनोंद सुमारे दोन हजारांपर्यंत होत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले असून नियमांच्या कठोर अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. दादरचे भाजी मार्केट आणि फूल मार्केट रात्री ३ वाजल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू असते.

    मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही दादरच्या भाजी आणि फूल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढल्याने या ठिकाणचे भाजी आणि फूल मार्केट वांद्रे-कुर्ला संकुल आणि सोमय्या मैदानावर हलवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. याबाबत आज पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांची भेट घेऊन चर्चाही केली.

    मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. दैनंदिन रुग्णनोंद सुमारे दोन हजारांपर्यंत होत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले असून नियमांच्या कठोर अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. दादरचे भाजी मार्केट आणि फूल मार्केट रात्री ३ वाजल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू असते.

    या वेळी हजारो विक्रेते, व्यावसायिक, वाहतूकदार या ठिकाणी येतात. त्यामुळे प्रचंड गर्दी होते. तीन जत्रांइतकी गर्दी या ठिकाणी होते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याने या ठिकाणाचे भाजी, फूल मार्केट बीकेसी, सोमय्या मैदानावर हलवण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.

    धारावी–दादरमध्ये रुग्णांची संख्या वाढतीच

    पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जी/उत्तर विभागातील धारावीसह दादर, माहीममधील रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रुग्णवाढ होत आहे. १७ मार्च रोजी धारावीत १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर दादरमध्ये २० आणि माहीममध्ये २० रुग्ण आढळले आहेत.