‘सीएसएमटी’च्या भुयारी मार्गात फेरीवाल्याचा धुमाकूळ, महापालिकेच्या बुडाशी अंधार

कधीतरी या भुयारी मार्गातील या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होते. कारवाई होणार याची खबर देणारे त्यांचे खबरी आहेत. कारवाईची कुणकुण लागताच फेरीवाले आपले साहित्य तेथील दुकानातच लपवतात.

  मुंबई (Mumbai) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) समोरील भुयारी मार्गात फेरीवाल्याचा (Unauthorized peddlers) धुमाकूळ सुरू आहे. प्रवाशाना येथे चालताही येत नाही, अशी दुकाने अनधिकृत फेरीवाले थाटत आहेत. मात्र पालिका प्रशासनाचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत; मात्र या तक्रारींचे कोणत्याही पालिका अधिकाऱ्याला सोयर सुतक नसल्याचे दिसते. हा प्रकार म्हणजे महापालिकेच्या बुडाशी अंधार असाच असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून दररोज हजारो प्रवाशी समोरील भुयारी मार्गातुन बाहेर पडतात तसेच त्या भुयारातून ट्रेन पकडण्यासाठी धावत असतात. मात्र या भुयारी मार्गात असलेल्या अधिकृत दुकानासमोर अनेक फेरीवाले दुकाने थाटून बसत आहेत. साहित्य विकण्यासाठी या विक्रेत्यांची बोंबाबोंब सुरू असते. खेळण्यांचा कर्कश आवाज याचा प्रवाशाना कमालीचा त्रास होत असतो. मात्र मुजोर फेरीवाल्यांविरुद्ध कोणत्याही प्रवाशाची त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याचे धाडस होत नाही.

  नाममात्र कारवाई
  कधीतरी या भुयारी मार्गातील या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होते. कारवाई होणार याची खबर देणारे त्यांचे खबरी आहेत. कारवाईची कुणकुण लागताच फेरीवाले आपले साहित्य तेथील दुकानातच लपवतात. हे पालिकेच्या कारवाई करणाऱ्या अधिकार्यानाही माहीती असते. मात्र कारवाई हा फक्त दिखावा ठरत असल्याचे दिसून येते.

  फेरीवाल्यांची दादागिरी
  फेरीवाल्यांकडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकासोबत येथे वारंवार फेरीवाल्यांचे खटके उडताना दिसतात. येथे विक्रेत्यांची संघटित दादागिरी वाढल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

  प्रवाशांची अडचण
  फेरीवाले भुयारी मार्गातील संपूर्ण जागा साहित्याची मांडणी करून व्यापून टाकत आहेत. त्यामुळे प्रवाशाना चालण्यासाठी जागा अपुरी पडते. सकाळी आणि संध्याकाळी येथे प्रवाशांची मोठी अडचण होत असते. फेरीवाल्यांचा धुमाकूळ थांबवा अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.