अग्निशमन अधिका-याचा झोपेत मृत्यू; अग्निशमन दलात हळहळ

बोबडे हे सन २००६ साली अग्निशमन दलात भरती झाले होते. सध्या ते नरीमन पॉइंट येथील अग्निशमन केंद्रावर अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी वडाळा येथील कमांडिंग सेंटरमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी दीडपर्यंत त्यांनी प्रशिक्षण घेतले. या ठिकाणी २० किलो वजन पाठीवर घेऊन श्वसन उपकरणे सराव केला.

    मुंबई (Mumbai) : मुंबई अग्निशमन दलाचे नरीमन पॉइंट (Nariman Point) येथील केंद्र प्रमुख उत्कर्ष बोबडे (३८) (Utkarsh Bobade) यांचे गुरुवारी रात्री झोपेतच निधन झाले. उत्कर्ष बोबडे यांचा मृत्यू प्रशिक्षणानंतर कर्तव्यावर असताना झाला आहे असे मानण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुण आणि कर्तुत्ववान अधिका-य़ाच्य़ा मृत्यूने अग्निशमन दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    बोबडे हे सन २००६ साली अग्निशमन दलात भरती झाले होते. सध्या ते नरीमन पॉइंट येथील अग्निशमन केंद्रावर अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी वडाळा येथील कमांडिंग सेंटरमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी दीडपर्यंत त्यांनी प्रशिक्षण घेतले. या ठिकाणी २० किलो वजन पाठीवर घेऊन श्वसन उपकरणे सराव केला. शिडी चढणे, ट्रेड मिल, सायकल चालवणे, छोट्या आणि वाकड्या-तिकड्या पाइपमधून २० किलो वजन घेऊन दुसऱ्या बाजूला जाणे हे अतिशय जोखमीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते.

    सराव पूर्ण करून घरी गेल्यानंतर विश्रांतीसाठी ते झोपले होते. मात्र शरीराची हालचाल होत नसल्याचे दिसल्यानंतर पत्नीने त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचे झोपेतच निधन झाले होते, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली. दरम्यान, या घटनेचा संबंध बोबडे यांच्या नोकरीच्या दिनक्रमाशी आहे. त्यांचा मृत्यू कामावर असतानाच्या कालावधीत झाल्याचे गृहित धरण्यात यावे, अशी मागणी फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष Adv. प्रकाश देवदास यांनी केली आहे.