राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजाराची मदत द्या; राज ठाकरेंची मागणी

शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.” अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.

    मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्राच्या अनेक भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत ४३६ मृत्यू झाले आहेत. त्यमुळे या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाकडे केली आहे.

    “महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. पंरतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.” अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.

    मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

    दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. “आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. “सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत”, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. “सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहे, शेतपrक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.