मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारला (Thackeray Government) केले आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असे आवाहनच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
तातडीच्या मदतीची गरज
देवेंद्र फडणवीस यांनी तीन ट्विट केले आहेत. त्यात म्हटले आहे की, आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे. #MaharashtraRains
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2021
राज्य सरकारची माहिती अतिशय धक्कादायक
दुसऱ्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले की, राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळे आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्या संदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे.
शेतकरी मोठ्या संकटात
यंदाच्या पावसाळ्यात ४३६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे, असेही त्यांनी अन्य ट्विटमध्ये म्हटले आहे.