सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे.

    दरम्यान यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    तसेचं कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं. कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असंही फडणवीस म्हणाले.

    चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

    दरम्यान, सरनाईक जे आता सांगत आहेत, तेच तर आम्ही 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो. पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपसोबत पुन्हा युती करायला हवी, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. आता आम्ही याबद्दल आम्ही सकारात्मक बोलल्यास लगेच सामनामध्ये अग्रलेख येईल. सत्ता नसल्यानं यांच्या पोटात दुखत असल्याची टीका होईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.