तुम्हाला दिलेली लस बोगस लस तर नाही ना? फक्त हिरानंदानीच नाही तर मुंबईत नऊ ठिकाणी बोगस लसीकरण

कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत बोगस लसीकरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता असे एका पाठोपाठ एक असे प्रकार समोर येऊ लागले असून मुंबईत तब्बल नऊ ठिकाणी बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. सुमारे हजारहून अधिक जण या बोगस लसीकरणाचे बळी पडले आहेत.

  मुंबई : कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत बोगस लसीकरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता असे एका पाठोपाठ एक असे प्रकार समोर येऊ लागले असून मुंबईत तब्बल नऊ ठिकाणी बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. सुमारे हजारहून अधिक जण या बोगस लसीकरणाचे बळी पडले आहेत.

  लस घेतल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आले नाही. त्यामुळे घेतलेली लस खरी की खोटी? हा प्रश्न पडला आहे. यावर राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी झालेले लसीकरण खरे की खोटे, हे तंतोतंत ओळखण्यासाठी शास्त्रीय मार्ग नसल्याचे सांगितले आहे. कांदिवली, बोरिवली आणि वर्सोवानंतर आता खारमध्येही बनावट लसीकरण शिबीर घेण्यात आल्याचे समोर आले आहे. टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड या निर्मिती संस्थेने फरार आरोपी राजेश पांडे याच्याच इव्हेन्ट ग्रुपच्या वतीने कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हे शिबीर आयोजित केले होते. याप्रकरणात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  कांदिवली येथील हेरिटेज गृहनिर्माण सोयायटीमध्ये कोकिळाबेन रुग्णालयातील बडतर्फ मार्केटिंग प्रमुख राजेश पांडे आणि त्याच्या इव्हेन्ट ग्रुपने बनावट लसीकरण शिबीर राबविले. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून पांडे आणि कथित डॉक्टर फरार आहे. या बनावट लसीकरणाची माहिती समोर आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी या ग्रुपने लसीकरण शिबीर राबविले तेथील लोक तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.

  वर्सोवा पोलीस ठाण्यात मॅचबॉक्स प्रॉडक्शनच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बोरिवलीच्या आदित्य कॉलेजने लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर आता खारमध्येही अशाच प्रकारे बनावट लसीकरण शिबीर राबविण्यात आल्याचे समोर आले आहे.
  राजेश पांडे व संजय गुप्ता यांच्यासह इतर चौघांनी कोकिळाबेन रुग्णालयातर्फे कोविशिल्ड लसीकरण शिबीर आयोजित करीत असल्याची खोटी माहिती सांगून फसवणूक केल्याची तक्रार टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

  या लसीकरण शिबिरात निर्मिती संस्थेमधील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा २०६ जणांनी लस घेतली. प्रत्येकी १,३८० याप्रमाणे पांडे आणि त्याच्या ग्रुपने २ लाख ८४ हजार ६९६ रुपये घेऊन त्याबदल्यात कोव्हिशील्डच्या नावाखाली काहीतरी भेसळयुक्त द्रवपदार्थ दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून खार पोलिसांनी पांडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  बनावट लसीकरणाच्या संदर्भात मुंबईतील कांदिवली, वर्सोवा, खार पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून यात एकच टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान बनावट लसीकरण करणारी टोळी सध्या मुंबईत सतर्क असून या टोळीकडून मुंबईतील परळ, अंधेरी, कांदिवली व ठाण्यातील काही परिसरात अशा प्रकारचे लसीकरण करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

  बोगस लसीकरण कसे होत आहे, हे काम आमचे नाही, हे काम पोलिसांनी आहे आणि पोलिसांच्या तपासात ते समोर येईलच. सेरो सर्वेक्षणातून ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांच्यामध्येही अॅन्टीबॉडीज्ा् तयार होत असल्याचे समजते. पालिका सेरो सर्वेक्षण आयोजित करते, त्यामुळे तेच सांगू शकतील लसीकरण बोगस होते की खरे होते!

  - प्रदीप व्यास, आरोग्य सचिव, महाराष्ट्र राज्य